शिरगाव : काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय शिरगाव ता. राधानगरी येथील एका युवकांच्या बाबतीत घडली. नशीब बलवत्तर म्हणून तो एका मोठ्या संकटातून वाचला.
शेतकरी हणमंत चौगले हे आपल्या मळा नावाच्या शेतामध्ये नांगरट करण्यासाठी रोटावेटर घेऊन गेले होते.त्यांच्या समवेत त्यांचा मुलगा रूद्रप्रताप हणमंत चौगले (वय १८) हा गेला होता.
एका पट्टीतील नांगरट करून दुसऱ्या पट्टीतील नांगरट करण्यासाठी दोघेजण जात होते. यावेळी रोटावेटर चालू स्थितीत होता. बांधावरून जात असतानाच खालच्या बाजूला रोटावेटरचे तीन नांगे रूद्रप्रतापच्या मांडीत घुसले.
वडिलांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना हाक दिली. रूद्रप्रतापच्या मांडीत घुसलेले नांगे काढण्याचा प्रयत्न केला पण ते काही निघाले नाही. यातच तो बेशुद्ध पडला. या अवस्थेत रोटावेटरच्या नांग्यासह त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. अन् नशीब बलवत्तर म्हणून तो एका मोठ्या संकटातून बचावला.