छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर आणि चापानेर येथील दोन एटीएम फोडून रोख रक्कम लुटल्याची घटना आज पहाटे चार वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. एकाच महामार्गावर काही अंतरावर असलेली दोन्ही एटीएम मशीन एकाच पद्धतीने गॅसकटरच्या सहाय्याने फोडले आहेत.
तसेच सुरुवातीला सेंटरमधील सीसीटीव्हीवर स्प्रे मारल्याचा आढळून आले आहे. यामुळे दोन्ही प्रकरणातील चोरटे एकच असण्याची शक्यता आहे. दोन्ही घटनेत एकूण ३८ लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले.
चोरट्यांनी वैजापूर शहरातील स्टेशन रोडवरील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडल्याची घटना बुधवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत चोरट्यांनी एटीएम फोडत १६ लाख रुपये लंपास केल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी सुरुवातीला सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारला. यासोबतच विद्युत प्रवाह बंद केला. यानंतर गॅसकटरच्या सहाय्याने एटीएममशीन फोडली. त्यातली १६ लाख रुपये लंपास केले.
या प्रकरणात आयडीबीआय बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक संजीवकुमार बेहरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैजापूर पोलिसांत अज्ञात चोरट्यां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिस ठाण्याचे योगेश झाल्टे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. प्रसंगी स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विजय जाधव,नरेंद्र खंदारे, विठ्ठल डाके गोपाल पाटील आनंद घाटेश्वर यांनी घटनास्थळी पाहणी केली. घटनास्थळी श्वान पथकाने ही तपासणी केली आहे.
तर दुसऱ्या घटनेत कन्नड तालुक्यातील चापानेर येथील बसस्थानक परिसरातील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन आज पहाटे पावणे पाच वाजेच्या दरम्यान फोडल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने मशीन फोडून २२ लाख रुपये पळवले. वैजापूर आणि चापानेर येथील दोन्ही एटीएम एकाच महामार्गावर आहेत. तसेच चोरीच्या घटना एकाच प्रकारे करण्यात आल्याने चोरटे एकच असण्याची शक्यता आहे.