धैर्यशील मानेंचा पत्ता कट होणार? हातकणंगले लोकसभा मतदारसंघा मधून महायुतीकडून आमदारपुत्राच नाव आघाडीवर,राजू शेट्टींविरोधात नवा चेहरा

0
279

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा कोल्हापूर:

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन पैकी एक लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळण्याची दाट शक्यता असून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपूत्र राहुल आवाडे यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. तसे संकेत मिळाल्याने अयोध्या येथे होणाऱ्या श्री राम मुर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर २१ आणि २२ जानेवरीला इचलकरंजीत मोठा कार्यक्रम घेत प्रचाराचा नारळच फोडण्याची जय्यत तयारी आवाडे कुटुंबियांच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळतील असे सुतोवाच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मागील आठवडयात केले होते. पण, प्रत्यक्षात भाजपच्या गोटातून वेगळ्याच हालचाली सुरू आहेत. दोन्ही पैकी एक मतदार संघ घेण्यासाठी पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर अथवा हातकणंगले यातील एक मतदार संघ कमळाच्या चिन्हावर लढण्यासाठी पक्ष उत्सुक आहे. त्यासाठी कोल्हापुरातून धनंजय महाडिक, शौमिका महाडिक तर हातकणंगलेतून राहूल आवाडे, सुरेश हाळवणकर यांच्या नावाची चर्चा आहे.

विद्यमान खासदार प्रा. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना उमेदवारीचा शब्द दिल्याने त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पण, या दोन्ही खासदारांबाबत नकारात्मक मते असल्याच्या भावना भाजप नेत्यांपर्यंत पोहोचल्याने त्यांनी पर्यायी उमेदवारांची शोध घेण्याची मोहीम सुरू केली. यातूनच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राहुल आवाडे यांचे नाव पुढे आल्याचे समजते. त्यांना उमेदवारीचे संकेत मिळाल्याने श्री राम मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमाचे निमित्त साधून २१ ला इचलकरंजीत जंगी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भव्य मिरवणूक, साडी व कुर्ता तसेच राममूर्ती वाटप करण्यात येणार आहे. या निमित्ताने मतदार संघातील प्रत्येक गावात आणि चौकाचौकात आवाडेंचे फलक लावण्यात येणार आहेत.
२०१९ साली राहूल आवाडे शिवसेना अथवा भाजपच्या वतीने रिंगणात उतरण्यासाठी इच्छूक होते. मात्र, ऐनवेळी त्यांना माघार घ्यावी लागली. आता मात्र, भाजपच्या चिन्हावर लढण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. माने यांना पर्याय म्हणून राहुल यांच्या नावाची चर्चा आहे. या मतदार संघात आवाडे गटाची चांगली ताकद आहे, यंत्रणा मोठी आहे. यामुळे ते शेट्टी यांना चांगली लढत देऊ शकतील, असे भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. या मतदार संघात महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेट्टी यांची उमेदवारी निश्चित आहे. यामुळे आवाडे आणि शेट्टी अशी लढत होण्याची शक्यता आहे.भाजपतर्फे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर इच्छूक आहेत. मात्र, त्यांची ताकद कमी पडण्याची शक्यता असल्याने आवाडे यांचे नाव पुढे करण्यात येत आहे. या बदल्यात विधानसभा निवडणुकीत आवाडेंनी हाळवणकरांना इचलकरंजी मतदार संघात मदत करावी असा पर्याय पुढे आणल्याची चर्चा आहे. यावर अजून अंतिम निर्णय न झाल्यानेच राहुल यांच्या नावाची अधिकृत घोषणा लांबणीवर पडत असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here