Kolhapur: गुंतवणूकदारांच्या तगाद्यामुळे मायलेकाने तणनाशक प्राशन करुन संपवले जीवन, अडकूर येथील घटना

0
68

एक हजार द्या पेन्शन सुरू, तीस हजार भरा घरासाठी विनापरतावा ७ लाख मंजूर करून देताे, असे सांगत २० लाखांहून अधिक रुपयांची गुंतवणूक केलेल्या लोकांनी आपली रक्कम परत करण्याचा तगादा लावल्याने भीतीपोटी रविवारी अडकूर येथे तणनाशक प्राशन केलेल्या मायलेकरांचा मंगळवारी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली.

या घटनेची नोंद चंदगडपोलिसांत झाली आहे. नंदा सूर्यकांत रोटे-पाटील (५०) व मुलगा शुभम रोटे-पाटील (३०, दोघेही सध्या रा. अडकूर, मूळगाव यळगूड, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, या दोघांनी दोन वर्षांपूर्वी अडकूर येथे महा-ई-सेवा केंद्र सुरू केले होते. त्यामध्ये त्यांनी अनेक लोकांसह महिलांना सरकारी व निमसरकारी योजनांचा लाभ मिळवून देतो म्हणून त्यांच्याकडून २० लाखांहून अधिक रक्कम उचलल्याचे समजते. मात्र, त्या गुंतवणूकदारांना लाभ मिळाला नाही. थोड्या दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या पैशांसाठी या मायलेकरांकडे तगादा लावला.

पण आपण पैसे देण्यास असमर्थ असल्याने दोघांनीही यातून सुटका मिळवण्यासाठी तणनाशक प्राशन केले. त्यांना तातडीने गडहिंग्लज येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. पण त्यांची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र मंगळवारी दुपारी नंदा यांचा, तर रात्री शुभमचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here