India Maldives News: गेल्या काही दिवसांपासून भारत आणि मालदीवमधील संबंध विकोपाला गेले आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी एक महत्त्वाची बैठक झाली. युगांडाची राजधानी कंपालामध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या मुद्द्यावर चर्चा केली.
दोन्ही नेते नॉन अलायन्ड मूव्हमेंट (NAM) च्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी तिथे गेले आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी मुसा जमीर यांच्यासोबत झालेल्या भेटीची माहिती X वर दिली आहे.
विशेष म्हणजे अलीकडेच मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी चीनचा दौरा केला आणि चौनवरुन परतल्यानंतर भारताला मालदीवमधील आपले सैन्य मागे घेण्यास सांगितले. यासाठी मालदीवने 15 मार्चची मुदत दिली आहे. या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती जमीर यांनी एक्सवर दिली. दरम्यान, सैन्य मागे घेण्याच्या मुद्द्यावर ‘उच्चस्तरीय कोअर ग्रुप’ तयार करण्यात आला असून, त्याची पहिली बैठक माले येथे झाली आहे. पुढील बैठक फेब्रुवारीमध्ये नवी दिल्लीत प्रस्तावित आहे.