गडहिंग्लज : माझ्या बायकोकडं सारखं का बघतोस ? तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत डोक्यावर लाकडी दांडक्याने प्रहार केल्यामुळे एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हल्यानंतर फरार झालेल्या तरूणाला तब्बल १३ दिवसांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली.
उत्तम भरमू नाईक (वय ५०) असे मृताचे नाव तर सचिन भिमराव नाईक (वय ३६) असे आरोपीचे नाव असून दोघेही बिद्रेवाडी, ता. गडहिंग्लज येथील रहिवाशी आहेत. या प्रकारामुळे नेसरीसह पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, बिद्रेवाडी, ता. गडहिंग्लज येथील उत्तम नाईक व सचिन नाईक हे दोघेही एकमेकांच्या शेजारी राहतात. रविवारी (७) उत्तम हे जेवणानंतर आपल्या घराच्या कट्यावर बसले होते.
दरम्यान, सचिन याने उत्तमच्या जवळ जावून ‘तू माझ्या बायकोकडे सारखे का बघतोस असे म्हणत वाद घातला, आज तुला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. त्यामुळे गंभीर जखमी झाल्याने उत्तम यांना उपचारासाठी येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच रविवारी (१४) उत्तम यांचा मृत्यू झाला. त्यामुळे सचिनविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तथापि, या घटनेनंतर सचिन हा घरातून फरार झाला होता. त्यामुळे पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना शोधपथके तयार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांनी ३ पथकाद्वारे सचिनच्या शोधासाठी सापळा लावला होता.
पोलिस निरीक्षक कळमकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संदीप जाधव, शेष मोरे, अमोल कोळेकर, महेश गवळी, अमित सर्जे, समीर कांबळे, नवनाथ कदम, शिवानंद मठपती, तुकाराम राजगिरे, सुशिल पाटील, यशवंत कुंभार, राजेंद्र वरंडेकर, अजय गोडबोले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
उत्तम बेशुद्ध,सचिन पसार!
लाकडी दांडक्याचा प्रहार वर्मी लागल्यामुळे उत्तम जागेवरच बेशुद्ध पडला होता.नेसरी ग्रामीण रुग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर त्याला गडहिंग्लज येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.दरम्यान,त्याचा भाऊ लक्ष्मण यांच्या फिर्यादीवरून नेसरी पोलीस ठाण्यात सचिनविरूद्ध गुन्हा दाखल झाला.म्हणूनच, तो गावातून पसार झाला होता.
‘लिंगनूर’मध्ये अटक, गुन्ह्याची कबुली
पोलिस अंमलदार अमोल कोळेकर यांना खबºयांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिन हा निपाणीहून लिंगनूर कापशीकडे जाणार असल्याची माहिती. त्यानुसार लिंगनूर पोलिस चौकीजवळ सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांना ‘टीप’ दिल्याच्या रागातून कृत्य?
या घटनेमागे बेकायदा दारू विक्रीचे कारण असून त्याची टीप पोलिसांना दिल्याच्या रागातूनच सचिन याने उत्तम याला मारहाण केल्याची चर्चा नेसरी परिसरात आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संदीप कांबळे यांनीही त्याला दुजोरा दिला असून त्यादृष्टीने तपास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.