
अयोध्येतील राम मंदिरामध्ये २२ जानेवारी रोजी होणाऱ्या रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत देशभरात उत्सुकता आहे. या सोहळ्याचं निमंत्रण सचिन तेंडुलकर, विराट कोहलीसह अनेक क्रिकेटपटूंना देण्यात आलं आहे.
माजी क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचा खासदार हरभजन सिंह यालाही या सोहळ्याचं निमंत्रण मिळालं आहे. दरम्यान, या सोहळ्यात उपस्थित राहण्यावरून हरभजन सिंग याने रोखठोक भूमिका मांडली आहे.
राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये सहभागी होण्यावरून आम आदमी पक्षाचा राज्यसभा खासदार हरभजन सिंग म्हणाला की, कुणी जाईल अथवा न जाईल, मी मात्र या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे. अनेक राजकीय पक्षांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण नाकारून या सोहळ्यावर टीका केल्याच्या पार्श्वभूमीवर हरभजन सिंगचं हे विधान महत्त्वपूर्ण आहे. मी आज जो काही आहे, तो देवाच्या आशीर्वादामुळे आहे.
हरभजन सिंग म्हणाला की, या काळात मंदिर बांधलं जात आहे, हे आमचं सौभाग्य आहे. आपण सर्वांनी तिथं गेलं पाहिजे आणि आशीर्वाद घेतले पाहिजेत. बाकी, कुणी जावो अथवा न जाओ, मी तिथे नक्कीच जाणार आहे. माझा देवावर विश्वास आहे. कुठला पक्ष तिथे जातो आणि कुठला जात नाही, यामुळे मला काही फरक पडत नाही, असेही हरभजन सिंगने स्पष्टपणे सांगितले.
यावेळी राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये न जाणाऱ्या इतर पक्षांवरही हरभजन सिंगने टीका केली. जर मी राम मंदिरामध्ये गेल्याने कुणाला काही अडचण असेल, तर त्यांनी हवं ते करावं. मी देवावर विश्वास ठेवतो, माझ्या आयुष्यात काही गोष्टी घडल्यात. त्या देवाच्या कृपेने घडल्या आहेत. त्यामुळे मी आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे.
दुसरीकडे राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून देशात राजकारणही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. भाजपा या सोहळ्याच्या माध्यमातून राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने केला आहे. मात्र नंतर आम आदमी पक्षाने राामायणातील सुंदर कांड पठण करण्याचा निर्णय घेतला होता.


