अयोध्येची सध्या जगभर चर्चा होत आहे. देशवासियांसाठी आजचा दिवस फार मोठा आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दुपारी १२:२० वाजता रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
त्यामुळे बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रतीक्षा अवघ्या काही क्षणांपुरती राहिली आहे. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी अयोध्यानगरी नववधूप्रमाणे सजली आहे. याच दरम्यान अयोध्येतील जमिनीच्या वाढत्या किमतींबद्दल जाणून घेऊया.
ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाने रामजन्मभूमीच्या बाजूने निर्णय दिला त्याच दिवशी तेथील जमिनींचे भाव गगनाला भिडले असल्याचं म्हटलं जात आहे. आज परिस्थिती अशी आहे की काही वर्षांपूर्वी जी जमीन लाखात होती, आज तिची किंमत कोट्यवधींवर पोहोचली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाचा याबाबत एक रिपोर्ट आहे. त्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की 2019 मध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय राम मंदिराच्या बाजूने आला तेव्हा मंदिराच्या आसपासच्या जमिनीचे दर वाढू लागले. किमान 25 ते 30 टक्के वाढ नोंदवली गेली. आगामी काळात अयोध्येत विशेषत: राम मंदिराच्या आसपासच्या परिसरात जमिनीचे दर आणखी वाढणार आहेत.
इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, पाच वर्षांपूर्वी अयोध्येत ज्या दराने जमीन उपलब्ध होत होती, त्यात आज पाच ते दहा पटीने वाढ होत आहे. म्हणजे पाच वर्षांपूर्वी एखाद्या जमिनीची किंमत 35 लाख रुपये होती, तर आज त्या जमिनीची किंमत 3 कोटींहून अधिक झाली आहे.
अयोध्येत जमिनीचे दर झपाट्याने वाढत आहेत. विशेषतः मंदिराच्या आजूबाजूच्या जमिनी महाग होत आहेत. सध्या अयोध्येत मंदिरासह इतर अनेक विकासकामे सुरू आहेत. एक मोठे पर्यटन स्थळ म्हणून सरकार या शहराकडे पाहत आहे. अयोध्येत राहणाऱ्या आणि प्रॉपर्टीचे काम करणाऱ्या आदित्य सिंह यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी सांगितलं की, मंदिरापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर रिकामी जागा शोधणे खूप कठीण आहे. मंदिराच्या अगदी जवळ कोणतीही जमीन आढळल्यास त्याचा दर प्रति चौरस फूट 20 हजार ते 25 हजार प्रति चौरस फूट आहे.