सध्या संपूर्ण देशाला फक्त एकाच दिवसाची प्रतिक्षा आहे तो म्हणजे २२ जानेवारी. या दिवशी प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येच्या राममंदिरात थाटामाटात प्रतिष्ठापना होणार आहे. देशभरात उत्साहाचं वातावरण असून तो क्षण आता काही तासांवर येऊन ठेपला आहे.
रामायण हा आपला इतिहास असला तरी ते घराघरात पोहचवण्याचं काम करण्यात दूरदर्शनच्या एका मालिकेचा मोठा हातभार होता. ही मालिका म्हणजे रामानंद सागर दिग्दर्शित ‘रामायण’. या मालिकेचं कोरोना लॉकडाउनदरम्यान पुनः प्रसारण करण्यात आलं, तेव्हाही रेकॉर्डब्रेक प्रेक्षकांनी ही मालिका पहिली. यातील कलाकारांची अजूनही तेवढीच क्रेझ आहे. आज यातील मुख्य भूमिका राम, लक्ष्मण सनी सीता हे कलाकार आजही चाहत्यांच्या संपर्कात असतात. पण आज आम्ही तुम्हाला या मालिकेत बिभीषण ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याबद्दल एक धक्कादायक गोष्ट सांगणार आहोत.
रामानंद सागर निर्मित ‘रामायण’ ही टीव्ही सीरियल लोकप्रियच नाही, तर नेहमी स्मरणात राहणारी आहे. या टीव्ही सीरियलमध्ये भगवान श्रीराम, लक्ष्मण, माता सीता, हनुमान, रावण आणि विभीषण आदी भूमिका साकारणारे कलाकार आजही लोकांच्या स्मरणात आहेत. आज आपण या टीव्ही सीरियलमधील बिभीषणची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश रावल यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. मुकेश याचं 2016 मध्ये निधन झालं. पण आज आपण मुकेश यांना बिभीषणाची भूमिका कशी मिळाली आणि त्यांचा मृत्यू कसा झाला,याविषयी जाणून घेऊया.
अभिनेते मुकेश रावल हे बराच काळ रंगभूमीशी निगडीत होते. त्यांची अभिनयक्षेत्रातील सुरुवात याच मंचावर झाली. याचवेळी एका नाटकादरम्यान रामानंद सागर यांची नजर त्यांच्यावर पडली. मुकेश यांनी मेघनादसोबत बिभीषण या भूमिकेसाठीही ऑडिशन दिली होती. मात्र, नंतर त्यांना बिभीषणाची भूमिका ऑफर करण्यात आली. या भूमिकेला त्यांनी योग्य न्याय दिला. त्यामुळेच आजही ही भूमिका अनेकांच्या स्मरणात आहे. पण मुकेश यांचा मृत्यू त्यांच्या चाहत्यांसाठी खूपच धक्कादायक होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार मुकेश रावल यांनी 2016 मध्ये आत्महत्या करत आयुष्य संपवलं. 2016 मुंबईतील कांदिवली स्टेशनजवळील रुळांवर त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला होता. त्यांनी असं का केलं? याचं कारणही नंतर सांगितलं गेलं होतं. मुकेश यांच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला होता. तेव्हापासून ते प्रचंड नैराश्यात होते, असं सांगितलं जातं. खरं तर मुकेश यांना एक मुलगा व एक मुलगी होती. मुलीचं त्यांनी लग्न करून दिलं होतं. पण त्यांच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला.
मुलीच्या लग्नानंतर मुकेश पूर्णपणे एकटे पडले होते. ते मुलाच्या आठवणीनं नैराश्यात गेले होते, असं सांगितलं जातं. दरम्यान, याच नैराश्यातून त्यांनी एकेदिवशी रेल्वे रूळांवर झोपून आत्महत्या केली होती.दरम्यान, रामायण सीरियलमधील बहुतांश कलाकारांचा मृत्यू झाला असला तरी ते त्यांनी केलेल्या भूमिकेमुळे अनेकांच्या स्मरणात कायम आहेत.