पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका मोठ्या घोषणेनंतर, सोलर पॉवर कंपन्यांचे शेअर रॉकेट बनले आहेत. सोलर पॉवर कंपन्यांच्या शेअर्सनी मंगळवारी 19 टक्क्यांची उसळी घेतली आहे. सरकार 1 कोटी घरांवर रूफटॉप सोलर सिस्टिम बसवणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली.
यासाठी प्रधानमंत्री सूर्योदय योजना (Pradhan Mantri Suryodaya Yojana) सुरू होईल, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, यामुळे गरीब आणि मध्यम वर्गातील लोकांचे वीजेचे बील तर कमी होईलच, पण भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरही बनेल, असेही पीएम मोदी यांनी म्हटले आहे.
बोरोसिल रिन्यूएबल्सचा शेअर 19% टक्क्यांपर्यंत वधारला –
सोलर ग्लास तयार करणारी कंपनी बोरोसिल रिन्यूएबल्सचा शेअर मंगळवारी 19 टक्क्यांच्या तेजीसह 601.50 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या शेअरने मंगळवारी 52 आठवड्यांतील नवा उच्चाक बनवला आहे. बोरोसिल रिन्यूएबल्सचा (Borosil Renewables) शेअर शनिवारी 507.35 रुपयांवर बंद झाला होता. सोलर पॉवर बिझनेसशी संबंधित वेबसोल एनर्जी सिस्टिमचा शेअरही मंगळवारी 10 टक्क्यांच्या अपर सर्किटसह 300.85 रुपयांवर पोहोचला आहे.
या कंपन्यांच्या शेअर्समध्येही तुफान तेजी –
एक कोटी घरांवर रूफटॉप सोलर लावण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर, स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडच्या शेअर्समध्येही जबरदस्त तेजी आली आहे. कंपनीचा शेअर 5 टक्क्यांच्या अपर सर्किटसह 528.95 रुपयांवर पोहोचला आहे. वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज (Waaree Renewable)चा शएअरही 5 टक्क्यांच्या अपर सर्किटसह 3008.80 रुपयांवर पोहोचला आहे. टाटा ग्रुप कंपनी टाटा पॉवरचा (Tata Power) शेअरही 4 टक्क्यांहून अधिकच्या तेजीसह 366.40 रुपयेवर पोहोचला आहे. कंपनीचा शेअर मंगळवारी 52 आठवड्यांच्या आपल्या नव्या उच्चांकावर पोहोचला आहे.
(टीप – येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)