गिरणी कामगारांना मुंबईत घरे देण्याकरिता हाऊसिंग स्टॉक वाढविण्याची आवश्यकता आहे.
रांजगोळी, कोन-पनवेल येथील घरांची तातडीने दुरुस्ती करून पाच हजार घरांची लॉटरी प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरणी कामगारांच्या प्रश्नांबाबत आयोजित बैठकीत दिले.
यावेळी मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक आदी उपस्थित होते.
गिरणीकामगार किंवा त्यांच्या वारसांना हक्काची घरे मिळाली पाहिजेत ही सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. त्यासाठीच्या कार्यवाहीला गती देण्यात आली असून गेल्या काही महिन्यात दोन टप्प्यात गिरणी कामगारांना सदनिकांच्या चावीचे वाटप करण्यात आले आहे.
मुंबईत ‘टेक्स्टाईल मिल म्युझियम’चे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच याठिकाणी गिरणी कामगारांच्या मुला-मुलींना काम देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.