कायनेटिक कंपनीची लुना तुम्हाला आठवत असेल का? की भारंभार गाड्यांच्या जंजाळात तुम्ही विसरून गेलात तुमच्या लहानपणीची मोपेड बाईक. ज्यावर फायंडल देखील मारायची सोय असायची. अनेक जण तर त्या लुनावरच दुचाकी चालवायला शिकले.
त्या तुमच्या स्मृती जागविण्यासाठी कायनेटिक कंपनी परत घेऊन येतेय ईलेक्ट्रीक लुना.
नावच पुरेसे आहे, परंतु सांगायची बाब अशी की ही मोपेड इलेक्ट्रीकमध्ये येत आहे. लुना पुन्हा लोकांच्या मनावर राज्य करेल की नाही माहिती नाही. कारण बजाजची चेतक फेल गेली आहे. तसाच काहीसा लुक ठेवला परंतु तेवढे तिला मार्केट कॅप्चर करता आलेले नाहीय. आता लुना काय करतेय ते पहावे लागेल.
कायनेटीक ग्रीन कंपनी येत्या २६ जानेवारीपासून लुनाची बुकिंग सुरु करत आहे. केवळ ५०० रुपयांत लुना बुक करता येणार आहे. तेव्हाच्या लुनामध्ये ५० सीसीचे इंजिन होते. सायकल सारखे पॅडल देखील होते. आताच्या लुनामध्ये 2 किलोवॉट पर्यंत लिथिअम आयन बॅटरी असू शकते. एकदा चार्ज केल्यावर ही लुना ७०-८० किमीपर्यंतची रेंज देऊ शकते.
लुना कधीकाळी ग्रामीण भाग, शहरी भागातील सामान्य माणसांच्या येण्याजाण्याचे साधन होते. सरकारी नोकरवर्ग या मोपेडचा वापर करायचे. महिला असो की पुरुष दोघांनाही ही मोपेड उपयुक्त होती. शेतमाल, व्यापारी देखील या मोपेडचा वापर करायचे. हळूहळू अॅक्टिव्हा सारख्या स्कूटर आल्या आणि लुना, एम८० सारख्या मोपेडचे दिवस संपले.
कायनेटीक लुना फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लाँच केली जाऊ शकते. या मोपेडची किंमत १ लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते. या बाईकचा वेग २५ किमी असू शकतो. यामुळे ती शाळकरी मुले, कॉलेजची मुले हे देखील बिना लायसन वापरू शकणार आहेत.