लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना अटक करू, असे खळबळजनक विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Assam CM Himanta Biswa Sarma) यांनी केले आहे. यामुळे काँग्रेस आणि भाजप सरकारमधील संघर्ष आणखी टोकाला पोहोचण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सध्या आसाममध्ये आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी सातत्याने आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्यावर निशाणा साधत आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी सुरू आहेत. अशातच मंगळवारी हिमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी आणि अन्य काँग्रेस नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, कन्हैया कुमार आणि इतर नेत्यांविरोधात कलम 120 बी, 143/147 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरण काय?
आसाममध्ये असलेल्या भारत जोडो न्याय यात्रेला मंगळवारी गुवाहाटीमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. या यात्रेमुळे शहरामध्ये वाहतूक कोंडी होईल असे कारण देत परवानगी नाकारण्यात आली. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांनी उभारलेले बॅरिकेट तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कट रचणे, सार्वजनिक कामात अडथळा आणणे, बेकायदेशीर सभा यासह विविध कलमांखाली काँग्रेस नेत्यांवर गुन्हे दाखल केले. आता हे गुन्हा सीआयडीकडेही हस्तांतर करण्यात आले आहेत. आसामचे डीजीपी जी. पी. सिंह यांनी याबाबत माहिती दिली.
सरमा काय म्हणाले?
दरम्यान, राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी माध्यमांशी बोलताना खळबळजनक विधान केले. गुवाहाटीमध्ये हिंसाचार आणि सरकारी आज्ञेचे पालन केले नाही म्हणून आम्ही राहुल गांधींविरुद्ध दिवाणी तक्रार दाखल करणार आहेत. आम्ही त्यांना भारत जोडो न्याय यात्रा गुवाहाटीतून नेऊ नये असा सल्ला दिला होता. मात्र ते 3 हजार लोकं आणि 200 वाहनांचा ताफा घेऊन आले. त्यांनी पोलिसांशी झटापट केली. राहुल गांधी यांनी बसमधून लोकांना भडकावले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही त्यांना अटक करू, असे सरमा म्हणाले.
राहुल गांधी यांना आताच अटक केली तर राजकारण होील. एसआयटी सध्या तपास करत असून लोकसभा निवडणुकीआधी राहुल गांधींवर कोणतीही कारवाई करणार नाही. कारण आसाममध्ये आम्ही निवडणूक जिंकणार असून यावरून राजकारण होता कामा नये, असेही ते म्हणाले.