कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खून खटल्यात बुधवारी (दि. २४) जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांच्यासमोर पंच साक्षीदाराने संशयित आरोपी वासुदेव भगवान सूर्यवंशी (रा.
साखळी, ता. यावल, जि. जळगाव) याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ओळखले. सूर्यवंशी याच्यासह तिघांनी साखळी येथील शेतात पिस्तूलातून गोळ्या चालवण्याचा सराव केला होता. त्या ठिकाणासाह सूर्यवंशी याचे घर आणि गॅरेजच्या पंचनाम्यातील पंच साक्षीदाराचा सरतपास आणि उलट तपास बुधवारी पूर्ण झाला. उद्या गुरुवारी (दि. २५) पुन्हा सुनावणी होणार आहे.
संशयित आरोपी वासुदेव सूर्यवंशी, सचिन अंदुरे आणि किरण पाटील या तिघांनी साखळी (जि. जळगाव) येथील शेतात २०१४ मध्ये पिस्तुलातून गोळ्या चालवण्याचा सराव केला होता. त्यांच्या अटकेनंतर चौकशीत हा प्रकार समोर आला. याची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी १२ डिसेंबर २०१८ मध्ये सूर्यवंशी याला सोबत घेऊन गोळीबार सरावाचे ठिकाण, त्याचे घर आणि गॅरेजची झडती घेऊन पंचनामा केला. त्यावेळच्या पंच साक्षीदाराची साक्ष बुधवारी न्यायालयात नोंदवण्यात आली.
तपास अधिका-यांच्या सांगण्यावरून पोलिसांसमोर साखळी येथील गोळीबार सरावाचे ठिकाण, संशयित सूर्यवंशी याचे घर आणि त्याच्या गॅरेजची पाहणी करण्यात आली. संशयित आरोपी सूर्यवंशी हाच रस्ता दाखवत घटनास्थळी घेऊन गेला होता, अशी माहिती साक्षीदाराने दिली. तसेच बेंगळुरू कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित असलेला संशयित सूर्यवंशी याला साक्षीदाराने ओळखले. त्याचे घर आणि गॅरेजच्या झडतीत काही आक्षेपार्ह वस्तू मिळाल्या नाहीत, असेही त्यांनी न्यायाधीसांसमोर सांगितले.
विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी सरतपास घेतला. संशयित आरोपी समीर गायकवाड, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यासह चौघे न्यायालयात हजर होते, तर अन्य सहा संशयितांनी बेंगळुरू कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीला उपस्थिती लावली.