प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा
अखेर मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर पोहोचलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला यश आले आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत यशस्वी चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास सरकारच्या सरकारच्या शिष्टमंडळाचे अधिकारी जरांगेच्या शिष्टाईसाठी आले होते. तब्बल अडीच ते तीन तास सरकारसोबत झालेली चर्चा आणि दिलेला अध्यादेश जरांगे-पाटील आपल्या वकिलांना आणि मराठा बांधवांना येऊन सांगत होते. त्यांचा होकार आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हे आंदोलन इथेच स्थगित करण्यात येणार असून आझाद मैदानात जाणार नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
यावेळी विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सर्व लोक मावतील असा मोठा मैदान बघून एक तारीख जाहीर करून आनंद साजरा करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
आज २७ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ते सभा घेणार आहेत. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री दीपक केसरकर गृहनिर्माण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या समक्ष मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अध्यादेश मनोज जरांगे पाटील स्वीकारून हे उपोषण सोडणार आहेत.
असा होता घटनाक्रम –
शुक्रवारी दुपारी मनोज जरांगे यांची ९ मागण्यांची घोषणा
सगेसोयरे यांच्या नावाने अध्यादेश द्या, संध्याकाळची दिली डेडलाईन
शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक
४ तास चालली बैठक, या बैठकीला सचिवांपासून ते पोलीस आयुक्त होते हजर
या बैठकीला मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे उपस्थित होते.
घटनाक्रम
शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास सरकारचं शिष्टमंडळ वाशीकडे रवाना
रात्री ११.३० वाजेपासून ते पहाटे १.३० वाजेपर्यंत मनोज जरांगे पाटील आणि शिष्टमंडळाची चर्चा
आज पहाटे ३ च्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन जरांगेंनी आंदोलन मागे घेणार असल्याची घोषणा