प्रियंका शिर्के-पाटील
वाशिम : शिक्षकांची पदोन्नती, प्रलंबित वैद्यकीय देयके, सातवा वेतन आयोगाचे थकीत हप्ते, दरमहा १ तारखेला वेतन यांसह विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर धडक देत जिल्हा परिषद अध्यक्षांसह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली.
शिक्षकांची पदोन्नती तातडीने करणे, प्रलंबित वैद्यकीय बिलाचा प्रश्न निकाली काढणे, सातवा वेतन आयोगाचा दुसरा, तिसरा व चौथा हप्ता देणे, जुलै २०२२ ते जानेवारी २०२३ चा ४ टक्के थकीत महागाई भत्ता, चट्टोपाध्याय व निवड श्रेणी फरकाची देयके तातडीने देणे, शिक्षकांचे वेतन दरमहा १ तारखेला करणे, ओबीसी व इतर सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न निकाली काढणे, पंचायत समिती मानोरामधील चट्टोपाध्याय व निवड श्रेणी शिक्षकांची सेवा पुस्तक पडताळणी करणे, जिल्हा परिषद शाळा व विद्यार्थी पटसंख्या टिकवण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून विशेष प्रयत्न व्हावे, शिक्षकांनी स्वतःहून शिकवण्याकडे लक्ष देणे व शिक्षकांकडील अतिरिक्त कामाचा बोजा कमी करणे, भविष्य निर्वाह निधी सन २०२२-२३ च्या पावत्या मिळण्यासाठी किंवा ऑनलाईन काढण्यासाठी प्रयत्न करणे यांसह अन्य प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांच्याशी शिक्षक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. ३० सप्टेंबरपर्यंत प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले.