भारतीय महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा पोलीस उपअधीक्षक बनली आहे. प्रजासत्ताक दिनानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथे दीप्ती शर्माला आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल तीन कोटी रूपयांचा धनादेशही दिला.
तसेच पोलीस उपअधीक्षकाचे जॉइंनिंग लेटरही देण्यात आले. क्रीडा कोट्यातून कोणत्याही खेळाडूला उत्तर प्रदेश सरकारकडून मिळणारे हे सर्वोच्च पद आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आग्रा येथील अन्य खेळाडूंनाही पुरस्कार देऊन सन्मानित केले.
दीप्ती शर्माने वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळवले. आजच्या घडीला ती भारताच्या संघाची प्रमुख खेळाडू आहे. दीप्तीने मागील वर्षी चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील टीम इंडियाला या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्यात यश आले. यापूर्वी २०२३ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघासोबत रौप्य पदक जिंकले होते. याशिवाय दीप्तीने तिच्या कामगिरीने भारतीय संघाला अनेक सामने जिंकून देण्यात मदत केली आहे. ती मूळची उत्तर प्रदेशातील अवधपुरी येथील रहिवासी आहे.
दीप्ती शर्मा ‘पोलीस उपअधीक्षक’
दरम्यान, दीप्तीच्या कामगिरीचे उत्तर प्रदेश सरकारने कौतुक केले आणि मुख्यमंत्र्यांनी दीप्तीचा गौरव केला. बक्षिसाच्या रकमेचा धनादेश आणि पोलीस उपअधीक्षक नियुक्तीपत्र दीप्तीकडे सुपूर्द करताना मुख्यमंत्र्यांनी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दीप्तीचे वडील भगवान शर्मा आणि भाऊ आणि वहिनी पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते.
पोलीस खात्यातील मोठे पद मिळाल्यानंतर भारतीय खेळाडूने आनंद व्यक्त केला. “उत्तर प्रदेशची रहिवासी असल्याने पोलीस उपअधीक्षक होणे हा अविस्मरणीय क्षण आहे. ही वर्दी परिधान करायला मला नक्कीच आवडेल”, असे दीप्ती शर्माने सागंतिले.