आयफोन मिळाला नसल्याचा राग, ट्रक चालकाच्या मुलाने आयुष्य संपवले

0
77

 आयफोन मिळत नसल्याच्या रागातून २० वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अनिकेत प्रल्हाद म्हस्के (२०) असे मृत तरुणाचे नाव आहे.

उस्मानपुऱ्यात सोमवारी ही धक्कादायक घटना घडली.

सध्या सर्वच वयोगटांत मोबाइलच्या वापराचे प्रमाण वाढले आहे. त्यात तरुण वर्गामध्ये महागड्या मोबाइलचे मोठे आकर्षण आहे. अनिकेत आई, वडील व लहान भावासह नागसेननगरमध्ये राहत होता.

शनिवारी रात्री त्याचा १६ वर्षांचा लहान भाऊ परिसरातच राहणाऱ्या मामाकडे झोपण्यासाठी गेला होता. तर, आई-वडील दोघेही कामावर गेले होते. सकाळी ६ वाजेच्या सुमारास भावाने घरी जात दरवाजा ठोठावला.

मात्र, वारंवार आवाज देऊनही अनिकेतकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीने घरात डोकावून पाहिले असता अनिकेत लटकलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती कळताच उस्मानपुऱ्याचे अंमलदार विजय वाघ यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अनिकेतला फासावरून उतरवून घाटी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

नुकताच बारावी उत्तीर्ण झालेला अनिकेत पदवीच्या प्रथम वर्षाला शिकत होता. वडील साखर कारखान्याच्या ट्रकवर चालक असून, आई खासगी रुग्णालयात नर्स आहे. आई रविवारी रात्री रुग्णालयात गेली होती.

तर, वडीलही कामावर गेले होते. मित्र व नातेवाइकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत गेल्या काही दिवसांपासून आयफोनसाठी हट्ट करत होता.

परंतु, आर्थिक परिस्थिती नसल्याने महागडा मोबाइल घेणे शक्य नसल्याचे घरच्यांनी त्याला समजावूनही सांगितले होते. त्या नाराजीतूनच त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी त्याने आत्महत्येपूर्वी कुठलाही मजकूर लिहिलेला आढळला नाही. त्याचा बंद मोबाइल ताब्यात घेतला असून आत्महत्येच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू असल्याचे अंमलदार विजय वाघ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here