अखेर घरफोडी करणारा तो पोलीस शिपाई सेवेतून बडतर्फ; दोन ठिकाणी केली होती घरफोडी, पोलिस विभागात खळबळ

0
50

चंद्रपूर : दोन ठिकाणी घरफोडी करणाऱ्या पोलिस शिपायास तत्कालीन पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी यांनी चक्क बडतर्फ केल्याने पोलीस विभागात मोठी खळबळ माजली आहे. कलम 311 अन्वये पोलिस खात्याची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवून तत्कालीन पोलीस अधीक्षक परदेशी यांनी बुधवार दिनांक 31 जानेवारी रोजी ही कारवाई केली.

नरेश डाहुले राहणार उपगन्लावर ले- आउट चंद्रपूर असे त्या बडतर्फ पोलिस शिपायाचे नाव आहे. 15 नोव्हेंबर 2023 रोजी मुस्तफा रमझान शेख यांनी घरी चोरी झाल्याची तक्रार रामनगर पोलिस ठाण्यात केली होती. दरम्यान रामनगर पोलिस पथकाने या प्रकरणाचा छडा लावताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असताना शेख यांच्या घराशेजारीच राहणारा तसेच स्थानिक गुन्हे शाखेमध्ये पोलिस शिपाई म्हणून कर्तव्यावर असणारा नरेश डाहुले हा संशयितरित्या आढळून आला. रामनगर पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता 14 नोव्हेंबर 2023 रोजी शेख यांच्या घरी व 31 ऑगस्ट 2023 रोजी घराजवळील एका अन्य शेजारच्या घरी घरफोडी केल्याची कबुली दिली.

तत्कालीन पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी त्याला तत्काळ अटक करण्याचे आदेश देऊन त्याला निलंबित केले होते. तेव्हापासून तो कारागृहात होता. दरम्यान मागील आठवड्यात त्याची जामीनावर सुटका करण्यात आली. परंतु तत्कालीन पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी 31 जानेवारी 2024 रोजी कलम 311 (2) अन्वये पोलीस खात्यातून थेट बडतर्फ केले आहे. या कारवाईने पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. अप्पर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू यांनी पोलिस शिपाई नरेश डाहुले याला 31 जानेवारी रोजी बडतर्फ केले असल्याच्या वृताला दुजोरा दिला आहे.

जिल्ह्यातील पहिली कारवाई
एखाद्या पोलीस शिपाई, कर्मचारी यांनी आपल्या कार्यकिर्दीत कसुरी केल्यास यांना निलंबित केल्याच्या बरेच कारवाया जिल्ह्यातील झाल्या आहेत. मात्र एखाद्या पोलिस शिपायास थेट सेवेतूनच बळतर्फ ( रिमुव्ह फार्म सर्विस ) केल्याची ही पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here