कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) गोकुळ – शक्ती हा नवा ब्रँड मुंबई गाजवणार, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
गोकुळ शक्ती नावाने तयार केलेल्या नवीन टोण्ड दुधाचा विक्री व वितरण प्रारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते, आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व चेअरमन अरुण डोंगळे तसेच संचालकांच्या उपस्थितीत नवी मुंबई (वाशी) येथे झालामुश्रीफ म्हणाले, ‘उत्कृष्ट चव आणि उत्तम प्रतीमुळे गोकुळ दूध संघाने मुंबई, पुणे, कोकण व अन्य ठिकाणी मोठा ग्राहकवर्ग जोडला आहे. ग्राहक तसेच मुंबईतील वितरकांनी ठराविक प्रतीचे स्पेशल दूध गोकुळकडून उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. यावर निर्णय होऊन गोकुळने ४.१ फॅट व ९.२ एस. एन.एफ प्रतीचे गोकुळ शक्ती नावाचे स्पेशल होमोजिनाइज्ड व बॅक्टोफ्युज दूध मार्केटमध्ये आणले आहे.’
आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘गोकुळ दूध उत्कृष्ठ चवीमुळे मुंबई तसेच उपनगरांत घराघरात पोहोचले आहे. गोकुळ शक्ती दूध बाजारपेठेत नाव करेल. वितरकही सहकार्य करतील.’ संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, ‘संघामार्फत फुल क्रीम व गाय दुधाची विक्री सांगली, बेळगाव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच पणजी(गोवा), पुणे व मुंबई, ठाणे जिल्ह्यात होत आहे. दररोज १४ लाख लिटर विक्री होते. गोकुळच्या पनीर, श्रीखंड, तूप, टेबल बटर, फ्लेवर मिल्क इत्यादी दुग्धजन्य पदार्थांना मागणी असते.’गोकुळ शक्ती’ टोण्ड दुधाची गुणवत्ता फॅट ४.१ व एस.एन.एफ. ९.२ असून किंमत प्रतिलिटर रुपये ५५ ठेवली आहे.दूध १ लिटर व ५ लिटरचे पाऊचमध्ये उपलब्ध आहे. स्वागत, प्रास्ताविक संचालक विश्वास पाटील तर शशिकांत पाटील-चुयेकर यांनी आभार मानले. संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, वाशी शाखेचे व्यवस्थापक दयानंद पाटील उपस्थित होते.