3 फेब्रुवारी 2024 : मुंबईपर्यंत मोर्चा काढून मराठा आरक्षणाचा अध्यादेश मिळाल्यानंतरही मनोज जरांगे पाटील हे अजूनही काही गोष्टींवर आक्रमक आहेत.
तर दुसरीकडे मराठा आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत असल्याचा आणि मागच्या दारातून मराठ्यांना आरक्षण दिले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता.
त्या दोघांमधील वाद अद्याप शमलेला नसून आता मनोज जरांगेंनी पुन्हा भुजबळांना खडे बोल सुनावत टीका केली आहे. ‘तू ओबीसींचं वाटोळं केलं आहे, आम्ही ओबीसींचे वाटोळे नाही होऊ देणार ‘ अशा शब्दांत मनोज जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधला. तू गप्प बस नाहीतर टपकन वर जाशील, असं धक्कादायक विधान करत त्यांनी भुजबळांना इशारा दिला.
काय म्हणाले मनोज जरांगे ?
टीव्ही 9 शी बोलताना मनोज जरांगेनी भुजबळांवर कडाडून टीका केली. ‘ आता आम्ही ओबीसी मध्ये गेलो आहेत, त्यांना स्थान नाही. मी तुला सांगतो, तू नादी लागू नको, गोरगरीब ओबीसींचे वाटोळं करू नकोस. मराठे ओबीसी आरक्षणात गेले आहेत. आता हेच ओबीसी बांधव त्याला ( भुजबळ) म्हणत आहेत तू काय कामाचा आहेस ? आता ओबीसीत सर्व आता गेले आहेत आणि तुला बाहेर निघायची वेळ आली आहे. आम्ही सर्व मिळून तुला बाहेर फेकतो असे म्हणत आहे.’ अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.
तू गप्प बस नाही टपकन वर जाशील
तू ओबीसीचे वाटोळे केले आहे, पण आम्ही ओबीसींचे वाटोळे नाही होऊ देणार. तुझं वय झालं आहे आणि या वयात एव्हडा लोड झेपत नाही. तू गप्प बस नाही तर टपकन वर जाशील अशा शब्दात मनोज जरांगे यांनी भुजबळांना इशारा दिला. गप्प रहा, यडपट माणूस आहे. हे कसे ओबीसीच्या हाताला लागले, ओबीसींचे वाटोळे करत आहे.
मला म्हणतो उपोषण करू नको, तू नको करू आंदोलन, गप्प पड एका जागी. तू माझ्या नादी लागू नको, तुझे वय झाले आहे. तुझ्या वयानुसार आम्ही तुझा आदर करू. तू गप्प बसला तर आम्ही तुझा शंभर टक्के आदर करू. पण जर गप्प बसला नाही तर तुला मी काही सोडत नाही, असेही मनोज जरांगेंनी भुजबळांना सुनावले.
सोमवारी घेणार पत्रकार परिषद
यावेळी मनोज जरांगे यांनी आपण सोमवारी सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचेही नमूद केले. जे समाजासमोर बोंबलत आहेत, की मराठा समाजाला मुंबईत गेल्यानंतर काय मिळाले ते मी स्पष्ट करणार आहे. 70 वर्षात कोणी कोणी काय मिळु दिले नाही हे सांगणार आहे. आता समजाला मिळतंय, तर 75 वर्षात ज्यांनी समाजाला का मिळू दिले नाही आणि त्यांच्या पोटात का दुखत आहे याचं कारणही सांगणार आहे, असं जरांगे पाटील यांनी सांगितलं . मी गोरगरीब मराठ्यांचे काम का करू नये..? यांची का इच्छा आहे हे ही सोमवारी सांगणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.