गेल्या काही महिन्यांपासून लसणाचे दर वाढलेले असून अद्यापही सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरच आहेत. किरकोळ बाजारात लसणाचा दर सुमारे ४०० रुपये प्रतिकिलो विकला जात असल्याने ग्राहकांना नवीन लसणाची आणि दर कमी होण्याची प्रतीक्षा आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून लसणाचे दर वाढलेले असून ८० ते १०० रुपये प्रतिकिलो असणारा लसणाचा दर वाढतच गेला. परिणामी लसूण बाजारात ३६० ते ४०० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे.
पाव किलोला शंभर रुपये मोजावे लागत असल्याने सर्वसामान्यांना लसूण खरेदी करणे कठीण होऊ लागले आहे. अनेकजण लसूण खाणे टाळत आहेत.
तीन महिन्यांपूर्वी लसणाच्या दरात वाढ झाली होती आणि चांगला लसूण २०० रुपये प्रतिकिलोपर्यंत गेला होता. मात्र, आता या आठवड्यात लसणाच्या दराने आणखी उसळी घेतली असून चांगला लसूण घाऊक बाजारातच ३५० रुपये किलोपर्यंत आणि किरकोळ बाजारात ४०० रुपयांवर गेला आहे. मागच्या दोन वर्षांत लसणाचे दर तुलनेने कमी होते. घाऊक बाजारात लसूण ५० ते ८० रुपये किलोपर्यंत होता.
हे लसणाचे सर्वांत कमी दर होते. यातून उत्पादन खर्चही निघत नव्हता, दर पडत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी लसणाचे उत्पादन घेणेच थांबवले होते.
मागच्या वर्षभरात बहुतांश शेतकऱ्यांनी लसूण लागवड केलीच नव्हती. त्यामुळे आता बाजारात लसणाची कमतरता जाणवायला लागली आहे. उत्पादन आणि पर्यायाने आवक कमी असल्याने घाऊक बाजारात लसूण ३५० ते ४०० रुपये प्रतिकिलो झाला आहे.
काहीजण पर्याय म्हणून सुकलेला बारीक पाकळ्यांचा लसणाचा वापर करत आहेत. तोही २०० रुपये प्रतिकिलो आहे. तर, मोठ्या पाकळ्यांचा गड्डा असलेला लसूण ३०० ते ४०० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे.