गेल्या 11 कसोटी डावांत तिशीच्या फेऱयात अडकलेल्या गिलने स्वतःच्या खेळीला शतकापार नेत टीकाकारांना फोडून काढले आणि हिंदुस्थानी संघातही चैतन्य निर्माण केले.
गिलच्या शतकाच्या जोरावर हिंदुस्थानने दुसऱया डावात 255 धावांपर्यंत मजल मारत पाहुण्या इंग्लंडसमोर 399 धावांचे जबरदस्त आव्हान ठेवले आहे. इंग्लंडने तिसऱया दिवसअखेर 1 बाद 67 अशी दमदार सुरुवात केल्यामुळे आता ते विजयापासून 332 धावा दूर आहेत तर हिंदुस्थानला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी 9 विकेट टिपायचे आहेत.
पहिल्या कसोटीप्रमाणे दुसरा कसोटी सामनाही रंगतदार होणार, याचे संकेत तिसऱया दिवशी मिळाले आहेत. मात्र पहिल्या कसोटीत वर्चस्व प्रस्थापित करूनही हिंदुस्थानने सामना गमावला होता. ती चूक टाळताना आता हिंदुस्थानने चौथ्या दिवशी मालिका बरोबरीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे इंग्लिश बॅझबॉल विरुद्ध हिंदुस्थानी गोलंदाजी या संघर्षात कोणाची सरशी होते ते चौथ्या दिवशीच कळेल.
ऍण्डरसनचा हिंदुस्थानला हादरा
शनिवारच्या बिनबाद 28 वरून खेळ सुरू करणाऱया हिंदुस्थानला दिवसाच्या कोवळय़ा उन्हातच चाळिशीच्या जेम्स ऍण्डरसनने हादरवले. त्याने हिंदुस्थानी धावफलकावर तिशीही लागली नव्हती तेव्हा कर्णधार रोहित शर्माच्या भाळी आणखी एका अपयशी खेळीचा टिळा लावला, शर्मा बाद होत नाही तोच काही पुढच्याच षटकात त्याने द्विशतकवीर यशस्वीला दुसऱया डावात यशस्वी होऊ दिले नाही. 30 धावांतच आघाडीवीर बाद झाल्यामुळे हिंदुस्थानच्या पायाखालची वाळूच सरकली.
इंग्लंडचे गोलंदाज आणखी आक्रमक झाले. त्यामुळे हिंदुस्थानी चाहत्यांची धाकधुक वाढली. कारण पुढे गिल आणि अय्यर मैदानात होता आणि दोघेही फॉर्मसाठी धडपडत होते, पण दोघांनीही हिंदुस्थानी चाहत्यांच्या चेहऱयावर हास्य उमलवले. इंग्लिश गोलंदाजांना यशस्वीपणे थोपवत संघाला शंभरी ओलांडून दिली, पण 81 धावांची भागी रचल्यावर हार्टलीने अय्यरला बाद केले आणि उपाहाराला जाण्यापूर्वीं रजत पाटीदारलाही नेले. त्यामुळे हिंदुस्थानने 4 बाद 130 अशी मजल मारली होती.
गिलचे शतकी पुनरागमन
हिंदुस्थानचा प्रिन्स शुबमन गिलने आज आपला फॉर्म मिळवताना चाहत्यांची मनंसुद्धा जिंकली. गेल्या अकरा डावांतील अपयशामुळे हा प्रिन्स धावांच्या बाबतीत रंक झाला होता. त्याचे अपयश सर्वांच्या डोळ्यात खुपत होते.
त्यालाही विश्रांती देण्याची मागणी जोर धरत होती. तरीही संघ व्यवस्थापनाने गिलवर विश्वास ठेवला आणि त्याने तो विश्वास सार्थ ठरवला. विशेष म्हणजे गिल दबाबाखाली असला तरी त्याच्या फटक्यांवर कोणताही दबाव जाणवला नाही.
त्याने 60 चेंडूंत अर्धशतक तर 132 चेंडूंत शतक झळकावले. त्याने ऍण्डरसनला मान देत फिरकीला चोपून काढले. त्याने आपली तिसरी शतकी खेळी पूर्ण होताच नेहमीप्रमाणे जल्लोष केला नाही. शतकानंतर शांतपणे बॅट उंचावणारा गिल पहिल्यांदाच दिसला. पण त्याची शतकी खेळी फार लांबली नाही. शतकानंतर त्याने चक्क आपली विकेट फेकली. गिल आणि अक्षर पटेलने उपाहारानंतर दमदार खेळ करताना पाचव्या विकेटसाठी 89 धावांची भागी केली. याच भागीने हिंदुस्थानी आघाडीला खर्या अर्थाने ताकद दिली.
गिलनंतर हिंदुस्थान कोसळला
गिलच्या शतकानंतर हिंदुस्थान मोठी धावसंख्या उभारेल असे चित्र होते, पण गिल बाद होताच हिंदुस्थानचा डाव संपायला फार वेळ लागला नाही. 4 बाद 211 वरून हिंदुस्थानची सर्वबाद 255 अशी घसरगुंडी उडाली. तळाला रविचंद्रन अश्विनने केलेल्या 29 धावांमुळे हिंदुस्थान अडीचशेचा टप्पा गाठू शकला. टॉम हाटर्ली आणि रेहान अहमदने हिंदुस्थानचे शेवटचे सहा फलंदाज 44 धावांत बाद केले. त्यामुळे इंग्लंडने हिंदुस्थानच्या आघाडीला चारशेचा टप्पा ओलांडू दिला नाही.