बँक मॅनेजर खून प्रकरणी अवघ्या आठ तासांत एलसीबीकडून चौघांना अटक…

0
36

प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा

इचलकरंजी : हातकणंगले तालुक्यातील कबनूर परिसरात घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील चौघा आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या आठ तासांच्या आत अटक करून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. या जलद आणि प्रभावी कारवाईबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी संबंधित पथकाचे कौतुक केले आहे.२८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री कबनूर येथील इंदिरा हौसिंग सोसायटीत राहणारे बँक मॅनेजर अभिनंदन जयपाल कोल्हापूरे वय ४४ यांचा खून झाल्याची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. प्राथमिक तपासात कबनूर येथील हॉटेल वैशाली येथे झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे उघड झाले.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी तातडीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.तांत्रिक माहितीचा वापर करून आणि गोपनीय सूत्रांच्या मदतीने या पथकाने चौंडेश्वरी फाटा चिपरी, ता. शिरोळ परिसरात सापळा रचला आणि अवघ्या काही तासांतच चार आरोपींना ताब्यात घेतले.अटक झालेल्यांमध्ये पंकज संजय चव्हाण २७, रा. कबनूर, रोहित जगन्नाथ कोळेकर २४, रा. कागल, विशाल राजू लोंढे ३१, रा. इचलकरंजी आणि आदित्य संजय पवार २१, रा. इचलकरंजी यांचा समावेश आहे.चौकशीत आरोपींनी हॉटेलमधील वादातून रागाच्या भरात ही घटना घडल्याची कबुली दिली असून, त्यांना पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत निरीक्षक रविंद्र कळमकर, उपनिरीक्षक शेष मोरे, अतिष म्हेत्रे, महेश खोत, महेश पाटील, अनिल जाधव, सागर चौगले तसेच सायबर पोलीस ठाण्याचे सुरेश राठोड यांनी सक्रिय सहभाग घेतला.या यशस्वी कारवाईबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले असून, तात्काळ आणि काटेकोर तपासामुळे गुन्हे उघडकीस आणण्यात एलसीबीने पुन्हा एकदा आपली तत्परता सिद्ध केली आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here