झारखंडमधील राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. झारखंडमधील चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील फ्लोर टेस्टदरम्यान उपस्थित आहेत. झारखंडमध्ये जे काही घडले, त्यात राजभवनाचाही हात होता. मी आदिवासी आहे, मला नियम-कायद्यांची नीट जाण नाही. ३१ जानेवारीला घडलेल्या घटनेची कथा २०२२ पासून लिहिली जात होती, असा आरोप फ्लोर टेस्टपूर्वी हेमंत सोरेन यांनी केला.
“मी आदिवासी आहे, त्यामुळेच मला टार्गेट केले जात आहे. पहिल्यांदाच देशाच्या मुख्यमंत्र्यांना अटक झाली आहे. मी हार मानली नाही. आदिवासी दलितांबद्दल द्वेषाचे वातावरण निर्माण केले जात आहे.
आम्हाला जंगलात जाण्यास सांगितले जात आहे. जर ते शक्य झाले तर ते आम्हाला जंगलात पाठवतील. मी अश्रू ढाळणार नाही. जमीन माझ्या नावावर आहे, हे सिद्ध करण्यासाठी मी माझे अश्रू सावरीन. माझ्यावरील घोटाळ्याचे आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेन. मला तुरुंगात डांबून त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ शकणार नाहीत”, असे हेमंत सोरेन म्हणाले.
हेमंत असेल तर हिंमत आहे – चंपाई सोरेन
तत्पूर्वी, राज्याचे नवे मुख्यमंत्री चंपाई सोरेन म्हणाले, “विरोधकांनी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. कोरोना महामारीत हेमंत सोरेन सरकारने चांगले काम केले.
हेमंत सोरेन यांच्या सक्षम नेतृत्वाखाली झारखंड पुढे गेले. हेमंत असेल तर हिंमत आहे. ज्या कुटुंबात शिक्षणाचा दिवा कधीच पेटला नाही, अशा कुटुंबात आम्ही दिवा लावू. हे चुकीचे आहे का? केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. हेमंत सोरेन यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. आमच्या योजना कोणीही पुसून टाकू शकत नाही. आम्ही अभिमानाने सांगू की, आम्ही भाग-२ आहोत.”
किती आहे बहुमताचा आकडा?
८१ सदस्यीय झारखंड विधानसभेत बहुमताचा आकडा ४१ आहे. आघाडीचा विचार केला तर चंपाई सरकारकडे या किमान बहुमताच्या आकड्यापेक्षा पाच अधिक आमदार आहेत. विधानसभेच्या ८१ जागांपैकी एक जागा रिक्त आहे, त्यामुळे ८० जागांची मोजणी केल्यानंतर बहुमताचा आकडा ४१ आहे.
दरम्यान, झारखंड मुक्ती मोर्चाने दावा केला आहे की, त्यांच्याकडे पुरेशी संख्या आहे. फ्लोर टेस्टमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. विधानसभेत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (ML) एकूण ४६ आमदार आहेत. यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे २८, काँग्रेसचे १६, आरजेडीचा एक आणि सीपीआय (एमएल)च्या एका आमदारांचा समावेश आहे. विरोधी पक्ष भाजपा आणि मित्रपक्षांकडे एकूण २९ आमदार आहेत.