काँग्रेस नेते राहुल गांधी आज ‘भारत जोडो न्याय यात्रा’ घेऊन झारखंडची राजधानी रांची येथे पोहोचले आहेत. राहुल 2 फेब्रुवारीला झारखंडमधील पाकूरला पोहोचले होते, तेथून राहुल धनबाद, बोकारो आणि रामगडमार्गे रांचीला पोहोचले.
यात्रा 4 फेब्रुवारीला रामगडला पोहोचली, तेथून ते संध्याकाळी रांचीला रवाना झाले. यावेळी त्यांनी वाटेत कोळसा वाहून नेणाऱ्या मजुरांशी संवाद साधला आणि त्यांची कमाई जाणून घेतली. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
मजुरांसोबतच्या भेटीचे काही फोटोही शेअर केले आहेत, ज्यामध्ये ते त्यांच्याशी बोलताना आणि सायकल चालवताना दिसत आहे. “सायकलवरून 200-200 किलो कोळसा घेऊन दररोज 30-40 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या तरुणांचं उत्पन्न नाममात्र आहे. त्यांच्यासोबत चालल्याशिवाय त्यांचा भार, त्यांच्या समस्या समजून घेता येणार नाहीत. या तरुण मजुरांचं आयुष्य मंदावलं तर भारताच्या उभारणीचं चाकही थांबेल” असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे
रांचीमध्ये राहुल यांच्या स्वागतासाठी लोकांची झुंबड उडालेली पाहायला मिळत आहे. काँग्रेस कार्यकर्ते पक्षाचा झेंडा घेऊन राहुल गांधींची वाट पाहत होते. शहरात राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. रांचीला जाताना राहुल गांधी चुत्तुपलू व्हॅलीच्या शहीद स्थळावरही थांबले. राहुल यांनी येथे शहीद टिकैत उमराव सिंह आणि शाहिद शेख यांना श्रद्धांजली वाहिली.
न्याय यात्रेसह रांची जिल्ह्यातील इरबा येथे पोहोचल्यानंतर राहुल गांधी हे इंदिरा गांधी हँडलूम प्रोसेस ग्राउंडवर विणकरांशी संवाद साधणार आहेत. दुपारच्या जेवणानंतर राहुल आपल्या यात्रेसोबत रांचीच्या शहीद मैदानात जाणार आहेत. ते येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या जाहीर सभेसाठी मोठी गर्दी होत आहे.