कोल्हापूर : महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील मार्गदर्शक बाळ राजाराम गायकवाड (वय ९२) यांचे आज मंगळवारी सकाळी येथील खासगी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. देशभरात दबदबा निर्माण केलेल्या उत्तरेतील पैलवानांचा कर्दनकाळ ठरलेल्या कुस्ती सम्राट युवराज पाटील यांचे बाळ गायकवाड हे गुरु होत.
अनेक जिगरबाज पैलवानांना घडविणाऱ्या बाळ गायकवाड यांची कुस्तीचे भीष्माचार्य म्हणून ओळख होती.
बाळ गायकवाड यांना ऐन तारुण्यात कुस्तीची आवड निर्माण झाली. त्यांनी कुस्ती खेळली खरी परंतु फारशी मैदाने केली नाहीत. परंतू कुस्ती कलेवरील प्रेमापोटी त्यांनी या क्षेत्रात वाहून घेतले. स्वत: घेतलेल्या कुस्तीतील ज्ञानाचा उपयोग त्यांनी नव्या दमाच्या पैलवानांना देण्यासाठी केला. गेली सत्तर वर्षे त्यांनी कुस्ती क्षेत्रासाठी एक मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडली. कुस्ती क्षेत्रात योगदान देता यावे म्हणून त्यांनी घरदार सोडून सर्वस्वाचा त्याग करत तालमीत वास्तव्य केले.