परजातीतील व्यक्तीशी लग्न केल्यामुळे आजही देशात अनेक घरांमध्ये वाद, भांडणं व प्रसंगी हिंसाचारही होतो. मध्य प्रदेशातही आंतरजातीय लग्न करण्यासाठी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका मुलीच्या भावाने तिला अडून मारहाण केली.
पोलीस चौकीसमोर झालेल्या या प्रकारानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली. ‘आज तक’ने त्याबाबत वृत्त दिलं आहे.
मध्य प्रदेशातील रीवा इथल्या तरुण-तरुणीने घरातून पळून जाऊन लग्न करून स्वतःचा संसार थाटायचं ठरवलं खरं, पण कुटुंबीयांना त्यांचं लग्न मान्य नव्हतं. आंतरजातीय लग्नाला त्यांचा विरोध होता. दोघं घरातून पळून जाणार असल्याची माहिती मुलीच्या भावाला समजली आणि त्यानं भर रस्त्यात त्यांना गाठून गोंधळ घातला. बहिणीला मारहाण करत तो घरी घेऊन जाऊ लागला, मात्र बहिणीने विरोध केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खूप वेळ हा गोंधळ सुरू होता. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
हा व्हिडिओ सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याच्या भागातील आहे. एक तरुण भर रस्त्यात एका तरुणीला मारत असल्याचा हा व्हिडीओ आहे. हे पाहून जमाव गोळा झाला, मात्र कोणीही मधे पडलं नाही. एक तरुणी बाईकवर एका तरुणाबरोबर बसली होती. दुसऱ्या तरुणाने तिला खाली ओढत मारहाण केली. काही लोकांनी आक्षेप घेतल्यावर सगळेजण पोलीस ठाण्यात गेले व पोलिसांसमोर त्यांनी आपापली बाजू मांडली.
कुटुंबीयांचा लग्नाला विरोध
ही घटना प्रेमप्रकरणाशी संबंधित आहे. एक तरुण आणि तरुणी दोघांमध्ये बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते. एकत्र संसाराची स्वप्न त्यांनी रंगवली होती, मात्र दोघांची जात वेगवेगळी असल्यामुळे त्यांचे कुटुंबीय लग्नाला तयार नव्हते. यामुळेच अखेर त्या दोघांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या भावाला याची कल्पना आल्याने बस स्टँडवर पोहोचण्याआधीच त्यांना भावानं गाठलं.
पोलिसांनी केली मध्यस्थी
कुटुंबाचा लग्नाला विरोध होता. या प्रकरणात पोलिसांनी दोघांनाही समजावलं, मात्र कोणीही समजून घ्यायला तयार झालं नाही. त्यामुळे पोलिसांनी तरुणीला वन स्टॉप सेंटरला पाठवलं आणि तरुणाला समज देऊन कुटुंबीयांकडे सोपवलं.
या बाबत सीएसपी शिवाली चतुर्वेदी यांनी सांगितलं, की या प्रकरणात दोघंही सज्ञान आहेत आणि एकत्र राहण्याची त्यांची इच्छा आहे. पोलीसही या प्रकरणात समजूत घालत आहेत. मुलीचं समुपदेशन करण्यासाठी सध्या तिला वन स्टॉप सेंटरमध्ये पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.