कोल्हापूर:(प्रतिनिधी )प्रियंका शिर्के-पाटील
कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाचे शांततेने आंदोलन असताना त्याविरोधात झारीतील शुक्राचार्य काम करत आहेत. जबाबदार अधिकारीही चुकीचे वक्तव्ये करून ओबीसी व मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत.
मराठ्यांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिला. कपोल्पित गोष्टींवर विश्वास ठेऊ नका, मी असे कोणतेही वक्तव्य केलेले नसल्याचे स्पष्ट केले. जिल्हाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत १५ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत एका अधिकाऱ्याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची पोस्ट व्हायरल झाली होती. त्याबाबत जाब विचारण्यासाठी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.
संजय पवार यांनी मराठा आरक्षणासाठी समन्वयाने प्रयत्न सुरू असताना आपण आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे समजले असून, ही बाब घातक असल्याचे सांगितलेे. यावर जिल्हाधिकारी म्हणाले, आधी असे झाले आहे का हे तपासून बघूया, मग पुढील चर्चा करूया.
उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेली बैठक गोपनीय होती. त्यात काय चर्चा झाली हे मी सांगू शकत नाही. ज्या व्यक्तीने बैठकीत घडलेले बाहेर सांगितले तेदेखील प्रोटोकॉलचा भंग आहे. मी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मी बोललेले चुकीच्या पद्धतीने तुमच्यासमोर आले आहे.
ॲड. बाबा इंदुलकर म्हणाले, आपल्या उत्तराने आमचे समाधान झालेले नाही. खोटे आरोप होत असतील तर त्याचा खुलासा प्रशासनाने का दिला नाही, या प्रकरणाची चौकशी का केली नाही? ही चर्चा सुरू असताना बाबा इंदुलकर यांचा आवाज वाढल्याने त्यांच्यात व जिल्हाधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक खडाजंगी झाली. दिलीप देसाई यांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली.
विजय देवणे म्हणाले, उपमुख्यमंत्र्यांनी वेगवेगळी बैठक घेऊन गोपनीय चर्चा का केली, बैठकीत जाणीवपुर्वक गोंधळ घालण्याचा कुणी प्रयत्न केला का, मराठ्यांचे कोण दुश्मन असतील तर आम्ही त्यांच्या छाताडावर उभारू. यावर जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले,तिथे कोणतेही चुकीचे वक्तव्य झालेले नाही, त्यामुळे कपोलकल्पित निराधार गोष्टींवर विश्वास ठेवू नका. शासकीय कार्यालयात आपण काय बोलतो याकडे लक्ष द्या. हे कायद्याचे राज्य आहे, नियमाने चाला. यावेळी सुनील मोदी, बाबा पार्टे, आर. के. पोवार, माजी नगरसेविका रुपाराणी निकम, संगीत खाडे, कमलाकर जगदाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.