Kolhapur- बालिंगा येथील कात्यायनी ज्वेलर्सवरील दरोडा: शार्पशूटर अखेर जेरबंद

0
101

कोल्हापूर : जून २०२३ मध्ये बालिंगा (ता. करवीर) येथील कात्यायनी ज्वेलर्समध्ये झालेल्या दरोड्यातील शार्प शूटरला अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला अखेर यश आले.

मध्यप्रदेशातील मुरेना येथून त्याला पथकाने जेरबंद केले.

मुपेंद्र उर्फ राणा उर्फ पवन शर्मा (वय ३२, रा. मुरेना, जि. मुरैना, मध्यप्रदेश) असे अटकेतील शार्प शूटरचे नाव आहे. त्यानेच कात्यायनी ज्वेलर्सच्या मालकावर गोळी झाडून, ज्वेलर्सबाहेर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्याचा यापूर्वी उत्तुर (ता. आजरा) येथील दरोड्याच्या गुन्ह्यात सहभाग होता.

कात्यायनी ज्वेलर्समध्ये ८ जून २०२३ रोजी पडलेल्या दरोड्यातील चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली होती. त्या गुन्ह्यातील अन्य दोन संशयित पसार होते. त्यापैकी शार्प शूटर पवन शर्मा हा मध्य प्रदेशातील मुरेना येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुरेना येथे जाऊन शर्मा याला जेरबंद केले.

त्याच्याकडून काही दागिने जप्त करण्यात आले आहेत. या गुन्ह्यातील शर्मा याच्या आणखी एका साथीदाराचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरोडेखोरांनी फिर्यादी रमेश शंकरजी माळी, त्यांचा मेहुणा जितेंद्र माळी यांना मारहाण करून रमेश माळी यांच्यावर गोळीबार केला होता. त्यांनी दुकानातील रोख दीड लाख रुपये आणि १ कोटी ८७ लाख रुपयांचे दागिने लंपास केले होते.

एकूण पाच जणांना अटक

दरोड्याच्या गुन्ह्यातील सतीश उर्फ संदीप सखाराम पोहाळकर (वय ३७, रा. कणेरकरनगर रिंगरोड, कोल्हापूर), विशाल धनाजी वरेकर (वय ३२, रा. कोपर्डे, ता. करवीर), अंबाजी शिवाजी सुळेकर (वय ४४, रा. पासार्डे, ता. करवीर) आणि अंकित उर्फ छोटू श्रीनिवास शर्मा (वय २३, रा. अम्बाह, जि. मुरेना, मध्यप्रदेश) यांना पोलिसांनी अटक केली होती. आता पाचवा संशयित पवन शर्मा पोलिसांच्या हाती लागला. या गुन्ह्यातील आणखी एका संशयिताचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.

दरोड्यातील मुद्देमाल जप्त

दरोड्यातील ३७ तोळे दागिने, एक कार, एक दुचाकी जप्त केली होती. ४ मोबाईल, १ वायफाय डोंगल, २ पिस्टल, ७ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, अंमलदार रामचंद्र कोळी, संजय कुमार, विनोद कांबळे, राजेंद्र वरंडेकर यांनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here