प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर : महाविकास आघाडीच्या बदलत्या भूमिकेमुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील
उमेदवारीवरून चुरस निर्माण होत आहे.
अशातच संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य पक्षातूनच निवडणुकीला सामोरे जाण्याची ठाम भूमिका महाविकास आघाडीला कळवल्यानंतर उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचे नाव समोर आल्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती हे संपर्क क्षेत्राच्याबाहेर आहेत.
मात्र, अंतर्गत सुत्रांकडून आलेल्या माहितीनुसार संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापूरच्या आखाड्यातच शड्डू ठोकणार आहेत. काँग्रेसमधील एका जेष्ठ नेत्यांशी काल ६ जानेवारी रोजी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
११ फेब्रुवारी रोजी सभांजी राजे कोल्हापुरात आल्यानंतर नेमकी भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.महाविकास आघाडीकडून सरप्राइज उमेदवार असल्याची घोषणा काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केली होती त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांच नाव समोर आल होत.
हाच धागा पकडत संभाजीराजे छत्रपती यांनी देखील खासगीमध्ये काँग्रेसकडून आपण अनुकूल असल्याचे अनेक ठिकाणी बोलून दाखवले होते. महाविकास आघाडी पुरस्कृत स्वराज्य पक्षाला उमेदवारी द्यावी, असा प्रस्ताव संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडी पुढे ठेवला असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, महाविकास आघाडीकडून त्यांना तीन घटक पक्षापैकी एका घटक पक्षात प्रवेश करून उमेदवारी घ्यावी, असा प्रस्ताव आला असल्याचे समोर आले होते.त्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य पक्षातूनच निवडणुकीत लढवण्याचा निर्धार करून महाविकासचा प्रस्ताव धुडकावून लावला होता.
संभाजीराजे छत्रपती यांच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीने तत्काळ बैठक घेत श्रीमंत शाहू महाराज यांच्या उमेदवारीची चाचपणी केली. त्यानंतर माध्यमातून बातम्या आल्यानंतर संभाजीराजे छत्रपती गेल्या पाच दिवसांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत.
महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज यांच्या उमेदवारीबाबत लोकसभा मतदारसंघात आढावा घेण्याचे काम सुरू आहे.संभाजीराजे छत्रपती यांच्याशी ‘सरकारनामा’ने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांचे एकमत झाले आहे. महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
काल काँग्रेसच्या केंद्रीय पातळीवरून एका जेष्ठ नेत्याचा संभाजीराजे छत्रपती यांच्याशी संपर्क झाला आहे. या वेळी काँग्रेसने त्यांच्या भूमिकेवर सकारात्मक भूमिका दर्शवल्याचे माहिती सूत्राकडून मिळाली आहे. दोन फेब्रुवारीपासून संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संपर्क दौरे करणार होते. मात्र, त्यांनी अचानक दौरे रद्द करून अज्ञातस्थळी निघून गेले आहेत.