इचलकरंजी : मालमत्ता सात-बारामध्ये नोंद करण्याकरिता चार हजार रुपयांची लाच घेताना येथील तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. अमोल आनंदा जाधव असे त्याचे नाव आहे. याची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत करण्याचे काम सुरू होते.
तक्रारदारांच्या नातेवाइकांची लंगोटे मळा येथे ९०० स्क्वेअर फुटाची मालमत्ता आहे. ती मालमत्ता तक्रारदारांच्या नातेवाइकाच्या वडिलांकडून बक्षीसपत्राद्वारे सात-बारावरती नोंद करण्याकरिता तक्रारदार व नातेवाइक अमोल याच्याकडे गेले. त्यावेळी त्याने पाच हजार रुपये दिल्याशिवाय ही नोंद सात-बारावर घालणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधून याची माहिती दिली.
बुधवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अमोल याला चार हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अमोल हा सहा महिन्यांपूर्वी येथील तलाठी कार्यालयात हजर झाला होता. अल्पावधीतच तो लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. बुधवारची कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे व इतर सहकाऱ्यांनी केली.