
उचगाव प्रतिनिधी: पांडुरंग फिरिंगे
करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची विज वितरण विभागाकडे मागणी
उचगाव येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत सार्थक वळकुंजे (वय १६) या तरुणाचा ११,००० के.व्ही. हायटेन्शन विद्युत तारेच्या संपर्कात येऊन मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी विज वितरण विभागाकडे तातडीची मागणी केली आहे की, “इमारतींना चिटकून गेलेल्या सर्व विद्युत तारांना ब्रॅकेट लावून रस्त्याच्या मध्यभागी हलवण्यात यावे.”
सदर वस्ती दाट लोकवस्तीची असून, केवळ ४०० ते ५०० चौ.फुट क्षेत्रात छोटी-छोटी घरे आणि १ ते ३ मजली इमारती उभारण्यात आल्या आहेत. या भागातून जाणारी ११,००० के.व्ही. विद्युत तार इमारतींना अगदी चिकटून गेली आहे. या निष्काळजीपणामुळेच सार्थकचा जीव गेला असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
भूतकाळात याच भागातून ३३,००० के.व्ही. हायटेन्शन तार गेली होती. त्या वेळीही ४ ते ५ नागरिकांचे मृत्यू झाल्यावरच ती तार बंद करण्यात आली होती. “इतका अनुभव असूनही विज वितरण विभाग निष्काळजी का वागतो?” असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.
या पार्श्वभूमीवर करवीर शिवसेनेच्या वतीने मा. संदीप काकडे, सहाय्यक अभियंता (विज वितरण कार्यालय, उचगाव) यांना निवेदन देण्यात आले. अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी नेऊन नागरिकांच्या भावना समजावण्यात आल्या.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले –
“उचगावसारख्या दाट वस्तीत अशा हायटेन्शन तारांचे धोके गंभीर आहेत. जर ब्रॅकेट लावून तारा मध्यभागी घेतल्या असत्या, तर सार्थकसारखा कोवळा जीव वाचला असता. विज वितरण विभाग वीजबिल वसुलीमध्ये तत्पर असतो, तशी तत्परता अपघात टाळण्यासाठीही दाखवावी.”
शिवसेनेने इशारा दिला आहे की, जर विज वितरण विभागाने तातडीने कारवाई केली नाही, तर उचगाव विज कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
या वेळी राजू यादव (तालुका प्रमुख), सुनील चौगुले (युवासेना उपजिल्हाप्रमुख), योगेश लोहार (तालुकाप्रमुख), दीपक रेडेकर (उचगाव प्रमुख), संतोष चौगुले (माजी तालुकाप्रमुख), ग्रामपंचायत सदस्य अरविंद शिंदे, आबा जाधव, रामराव पाटील, गुरू माने, कृष्णा वळकुंजे, निवास यमगर, संजय गायकवाड आदी शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

