कोल्हापूर : बेकायदेशीर शस्त्र बाळगत इन्स्टाग्रामवरून फोटो, व्हिडिओ व्हायरल करून दहशत माजवणारा फाळकूटदादा आण्णा चेंबुरी याला पोलिसांनी बुधवारी (दि. ७) राजारामपुरीतील चुनेकर शाळेजवळून अटक केली.
प्रसाद राजाराम कलकुटकी (वय २१, रा. तीन बत्ती चौक, दौलतनगर, कोल्हापूर) असे अटकेतील आण्णा चेंबुरीचे मूळ नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त केला. चेंबुरी याच्या वाढदिवसालाच शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्या पथकाने ही कारवाई केली.
फाळकूट दादांकडून बेकायदेशीर पिस्तूल, बंदूक, तलवार अशा शस्त्रांचा वापर करून परिसरात दहशत माजवली जाते. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केले जातात.
विरोधी टोळ्यांना चिथावणी दिली जाते. यातून गुन्हेगारी वाढत असल्याने अशा प्रकारचे रिल्स बनवून दहशत माजवणाऱ्यांवर कारवाया करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले आहेत.
त्यानुसार शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्या पथकाकडून संशयित फाळकूट दादांच्या सोशल मीडिया खात्यांची तपासणी सुरू केली. यावेळी दौलतनगर येथील प्रसाद कलकुटकी ऊर्फ आण्णा चेंबुरी याचे पिस्तूलसह रिल्स व्हायरल झाल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी तातडीने त्याचा शोध सुरू केला असता, राजारामपुरी येथील चुनेकर शाळेजवळ तो असल्याचे समजले. पोलिस उपनिरीक्षक अभिजीत इंगळे यांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केले. तसेच त्याच्या कमरेला असलेले गावठी पिस्तूल जप्त केले. पुढील तपासासाठी त्याचा ताबा राजारामपुरी पोलिसांकडे देण्यात आला. उपनिरीक्षक इंगळे यांच्यासह अंमलदार रमजान इनामदार, गौरव चौगुले, रोहित चौगुले, सुरेश देसाई यांच्या पथकाने ही कारवाई केली.
वाढदिवसाला पोलिसांचे ‘गिफ्ट’
आण्णा चेंबुरी याचा बुधवारी वाढदिवस होता. वाढदिवस झोकात साजरा करण्याची तयारी त्याने आणि त्याच्या मित्रांनी केली होती. पण, व्हायरल झालेल्या रिल्सने त्याच्या नियोजनावर पाणी पडले आणि पोलिसांनी त्याला थेट कोठडीचे गिफ्ट दिले.
पाच हजार रुपयात आणले पिस्तूल
रिल्स तयार करण्यासाठी एका मित्राकडून पाच हजार रुपयांना पिस्तूल आणल्याची कबुली चेंबुरी याने पोलिसांना दिली. लाकडी मूठ असलेले गावठी बनावटीचे पिस्तूल वापरात नसून, ते केवळ फोटो आणि व्हिडिओसाठी वापरल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पिस्तूल विकणाऱ्या संशयिताचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.