इचलकरंजी : पंचगंगा नदी प्रवाहित करण्यात आली असून, त्यातील पाण्याची तपासणी करूनच पिण्यासाठी वापरायचे की नाही, याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.
पंचगंगा नदीतील पाण्याला काळपट रंग आल्याने २१ जानेवारीपासून येथून शहराला होणारा उपसा महापालिकेच्या वतीने बंद करण्यात आला होता. पंचगंगा नदीमध्ये पाण्याची पातळी किमान सुस्थितीत ठेवण्याकरिता पाटबंधारे विभागाला महापालिकेच्या वतीने विनंती करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी काळम्मावाडी धरणातून पाणी सोडण्यात आले असून, हे पाणी शहरापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे नदीचे पात्र उन्हाळ्यात काठोकाठ भरले आहे. अगदी नदीघाटावरील पायऱ्यांजवळ पाणी आले आहे.
पाण्याचा प्रवाह असल्याने वरील भागातून येणारे सर्व जलपर्णीही प्रवाहामुळे पुढे सरकत आहे. या पाण्याची चाचणी करूनच हे पाणी पिण्यासाठी उचलायचे की नाही, यासंदर्भात महापालिका निर्णय घेणार आहे. शहराला सध्या पाण्याचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत पंचगंगा नदीतील पाणी पिण्यासाठी उत्तम असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.