४५० रुपयांत सिलेंडर, भाजपा सरकारने या राज्यात केली आश्वासनाची पूर्तता, अर्थसंकल्पातून पाडला घोषणांचा पाऊस

0
78

राजस्थान सरकारने आज विधानसभेमध्ये आपला अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्य सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री दीया कुमारी यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी दीया कुमारी यांनी विविध कल्याणकारी योजनांसह विकास कार्यांचीही घोषणा केली आहे.

सुमारे २२ वर्षांनंतर राजस्थानच्या विधानसभेत स्वतंत्र वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. याआधी मुख्यमंत्रीच अर्थसंकल्प सादर करत असत. दरम्यान, आज दीया कुमारी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये महिला आणि तरुणींसाठी काही विशेष योजनांचाही समावेश आहे.

राजस्थानच्या वित्तमंत्री दीया कुमारी यांनी अर्थसंकल्पामध्ये पंतप्रधान मातृ वंदना योजनेमधून गर्भवती महिलांसाठी ६ हजार ५०० रुपयांचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली. त्याबरोबरच राज्यातील गरीब महिलांना ४५० रुपयांमध्ये एलपीजी सिलेंडर देण्याची घोषणा केली. या घोषणेचा लाभ राज्यामधील सुमारे ७३ लाख कुटुंबांना होणार आहे. त्याशिवाय सरकारने अर्थसंकल्पामधून लाडली सुरक्षा योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची घोषणाही करण्यात आली आहे. तसेच मुलींना सेल्फ डिफेन्स स्कीमसाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

याशिवाय आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्याना आणि नववी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना दरमहा एक हजार रुपये दिले जाणार आहेत. जवळपास ७० लाख विद्यार्थी-विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ होणार आहे. याबरोबरच गरीब कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाल्यावर सरकारकडून एक लाख रुपयांचा बाँड दिला जाईल. यासाठी सरकारकडून लाडो योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे.

दीया कुमारी यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणातून काँग्रेसवरही जोरदार टीका केली. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील मागील सरकारमुळे राज्यावर मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा पडल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर काँग्रेसच्या सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here