गडकिल्ल्यांचं संवर्ध आणि मराठा आरक्षणाबाबतची आग्रही भूमिका यांमुळे कोल्हापुरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तसेच त्यांनी स्वराज्य पक्ष नावाने राजकीय पक्षाचीही स्थापना केली आहे.
यावेळच्या लोकसभा निवडणुकीत ते कोल्हापूर मतदारसंघातून लढणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. या चर्चांदरम्यान, संभाजीराजे छत्रपतींची एका वेगळ्याचा कारणासाठी चर्चा सुरू आहे. ते कारण म्हणजे नेते असलेले संभाजीराजे आता अभिनेते बनणार आहेत. तसेच एका मराठी चित्रपटामध्ये ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणार आहेत.
संभाजीराजे छत्रपती हे कोणत्या चित्रपटात काम करणार आहेत, तसेच कोणती व्यक्तिरेखा साकारणार आहेत, याबाबत संभाजीराजेंनी एका मुलाखतीमधून माहिती दिली आहेत. संभाजीराजे यांनी दिलेल्या माहितीनुसार ते ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक पटकावणारे भारतीय कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये कोल्हापूर राजघराण्यातील छत्रपती शहाजी महाराज यांची भूमिका करणार आहेत. .या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे हे करत आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी मला दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा फोन आला होता. नागराज मंजुळे हे खाशाबा जाधव यांच्यावर आधारित एक चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. त्या काळात माझे आजोबा शहाजी महाराज यांनी खाशाबा जाधव यांना आर्थिक मदत केली होती.
दरम्यान, या चित्रपटामध्ये शहाजी महाराज यांची व्यक्तिरेखा साकारण्याबाबत नागराज मंजुळे यांनी मला विचारणा केली होती. शहाजी महाराज आणि माझ्या चेहरेपट्टीमध्ये आणि आवाजात साम्य असल्याने मंजुळे यांनी ही भूमिका मी करावी असा आग्रह केला होता. त्याप्रमाणे आता मी माझे आजोबा शहाजी महाराज यांची भूमिका करणार आहे.