
*कोल्हापूर प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे:
एकविसाव्या शतकात मुलगा मुलगी असा भेद राहिलेला नसून मुलींची प्रगती म्हणजे संपूर्ण समाजाचे प्रगती आहे असे प्रतिपादन नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केले ते कौन्सिल ऑफ एज्युकेशन या संस्थेतर्फे उभारलेल्या विद्यार्थिनी वसतिगृह इमारत उद्घाटन समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा मा. सौ. रजनीताई मगदूम होत्या, नामदार पाटील पुढे म्हणाले की,वर्तमान परिस्थितीत मुलांच्या पेक्षा मुलींची प्रगती वेगाने होत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली आघाडीवर आहेत इतकेच नव्हे तर भारतीय महिला संघाने क्रिकेट खेळामध्ये विश्वचषक कप जिंकला आहे, ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि अशी मुलींची प्रगती होण्यासाठी अशा विद्यार्थिनी वसतिगृहांची नितांत गरज आहे.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. विश्वनाथ मगदूम म्हणाले की कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या चारही महाविद्यालयामध्ये मुलांच्या पेक्षा मुलींची संख्या जास्त आहे म्हणून संस्थेने विद्यार्थिनींचे वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला तरी चारही महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी या वसतीगृहामध्ये प्रवेश घ्यावा . भविष्यकाळात या वसतिगृहामधील मधील प्रवेश क्षमता वाढवण्याचा संस्थेचा मानस आहे. या कार्यक्रमाला कौन्सिल ऑफ एज्युकेशन या संस्थेच्या अध्यक्षा सौ.रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम सदस्य ॲड.अमित बाडकर ॲड.वैभव पेडणेकर, शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रवीण पाटील, नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स चे प्राचार्य डॉ. उत्तम पाटील, पार्वती देवी कुंभार नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य भालचंद्र कुलकर्णी, चारही महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने या वसतिगृह इमारतीचे बांधकाम करणाऱ्या आर्किटेक्ट अनुज मिठारी आणि सिव्हिल इंजिनियर युवराज गोजारे यांचा सत्कार करण्यात आला याशिवाय कॉमर्स कॉलेजमधील सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या, एनसीसी मध्ये उत्तुंग कामगिरी केलेल्या, पुरुषोत्तम करंडकासाठी पात्र ठरलेल्या सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी यांनी मांडले तर सूत्रसंचालन सौ अश्विनी मगदूम यांनी केले. यावेळी चारही महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

