Paytm ला आणखी एक झटका; मोठ्या अधिकाऱ्यानं सोडली कंपनीची साथ, दिला राजीनामा

0
70

Paytm Share Price: पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेवर मोठी कारवाई करत निर्बंध लादण्याचा निर्णय घेतलाय. आता पेटीएम पेमेंट्स बँकेशी संबंधित आणखी एक मोठी बातमी आली आहे.

CNBC-TV18 च्या रिपोर्टनुसार, पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडच्या स्वतंत्र संचालक मंजू अग्रवाल यांनी राजीनामा दिला आहे. हा राजीनामा रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर घेण्यात आलाय.

मंजू अग्रवाल २०२१ पासून पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडच्या बोर्डाच्या सदस्य होत्या. त्या यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या. ३१ जानेवारी रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडवर मोठे निर्बंध लादले. रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेला २९ फेब्रुवारीनंतर नवीन ठेवी स्वीकारण्यास बंदी घातली आहे.

तपासात काय मिळालं?

रिझर्व्ह बँकेला केवायसीमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे ग्राहक, ठेवीदार आणि वॉलेट होल्डर्सची मोठी कोंडी झाली. रिझर्व्ह बँकेला अशी अनेक प्रकरणं आढळून आली ज्यात १०० पेक्षा जास्त लोकांकडे एकच पॅन आहे. अशी अनेक प्रकरणे तपासादरम्यान उघडकीस आली ज्यात १००० हून अधिक ग्राहकांनी एकच पॅन कार्ड लिंक केलं होतं. यातील काही खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत असल्याची सर्वात मोठी अडचण होती.

या त्रुटी समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेनं मनी लाँड्रिंगसारख्या गंभीर समस्यांबाबत चिंता व्यक्त करून कारवाई केली होती. पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडमध्ये पेटीएमचा हिस्सा ४९ टक्के आहे.

शेअर्सवर परिणाम

रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर पेटीएमच्या शेअर्समध्ये सतत चढ-उतार सुरू आहेत. गुरुवारी, कंपनीच्या शेअर्सची किंमत ४४७.१० रुपये प्रति शेअर होती, बाजार बंद होण्याच्या वेळी बीएसईवर पेटीएमच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांनी घसरण झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here