Kolhapur: पृथ्वीराज पाटील, हर्षद सदगीर स्वराज्य केसरीचे मानकरी

0
175
Kolhapur: पृथ्वीराज पाटील, हर्षद सदगीर स्वराज्य केसरीचे मानकरी

कोल्हापूर : खचाखच भरलेले खासबाग कुस्त्यांचे मैदान अन् काटाजोड लढतीत डोळ्याचे पाते लवते न लवते तोपर्यंत कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी, सेनादलाचा पृथ्वीराज पाटील याने इराणचा आंतरराष्ट्रीय मल्ल अली इराणी याला घिस्सा डावावर अस्मान दाखविले, तर महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर याने इराणचाच आंतरराष्ट्रीय मल्ल महदी इराणीला नागपट्टी लावून चितपट केले.

पहिल्या स्वराज्य केसरीच्या गदेचा मान महाराष्ट्राच्याच दोघा मल्लांनी पटकाविल्याने खासबाग मैदान शिट्ट्या, टाळ्यांनी दणाणून गेले. दुसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत उपमहाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ (पुणे) याने पंजाबचा आंतरराष्ट्रीय मल्ल लवप्रित खन्ना याचा कब्जा घेऊन गुणांवर मात केली.

माजी खासदार संभाजीराजे यांच्या वाढदिवसानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५०वा राज्याभिषेक दिन व राजर्षी शाहू महाराजांच्या १५०व्या जयंतीनिमित्त राजर्षी खासबाग कुस्ती मैदानात मल्लयुद्ध झाले. विजेत्या पृथ्वीराज पाटील व हर्षद सदगीरला रुस्तम ए हिंद पद्मभूषण महाबली सतपाल यांच्या हस्ते चांदीची गदा व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

एकाच दिवशी दीडशे कुस्त्या

या स्पर्धेत २० ते ८० किलोपर्यंतच्या सहा गटातील एकूण १५० कुस्त्या झाल्या. यात सेनादलाचा सोनबा गोंगाणे, यश माने, आदी महाराष्ट्र चॅम्पियन कुस्तीगीरांचा समावेश होता.

रेश्मा, अमृताचीही बाजी

राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती रेश्माने पारंपरिक प्रतिस्पर्धी पिंकी हरयाणा हिला अवघ्या चार मिनिटांत ढाक डाव टाकून चितपट केले. ही कुस्ती ७ वाजून ४९ मिनिटांनी सुरू झाली आणि ७ वाजून ५३ मिनिटांनी संपली, तर महाराष्ट्र केसरी अमृता पुजारीनेही हरयाणाचीच तुल्यबळ आंतरराष्ट्रीय मल्ल तन्नू रोहतकचा गुणांवर पराभव केला.

मैदान खचाखच भरले

स्वराज्य केसरी स्पर्धेनिमित्त भारत-इराण मल्लांमध्ये झालेल्या या लढतीत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, हर्षद सदगीर व इराणचे अली इराणी, महदी इराणी यांचे डाव-प्रतिडाव आणि महाबली सतपाल यांना पाहण्यासाठी सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, आदी ठिकाणाहून कुस्ती शौकीन उपस्थित होते. त्यामुळे मैदान पाच वाजताच खचाखच भरले. मैदानाभोवतालचा परिसर वाहनांच्या पार्किंगने गजबजला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here