
माजगाव ता.१२ ः शाळेतून घरी परतताना रस्त्यावर पडल्याने मेंदूला गंभीर दुखापत झालेल्या हर्षवर्धन धोंडीराम बोडके (वय १५ , रा. उत्रे, ता. पन्हाळा) या विद्यार्थ्याची २८ दिवस खासगी रुग्णालयात मृत्यूशी सुरु असलेली झुंज आज अपयशी ठरली. बोडके कुटुंबीयाचा एकुलता एक ‘चिराग’ विझल्याने साऱ्या गावाला काळरात्रीची अनुभूती आली. घरा-घरांतून ऐकू येणारे हुंदके हे हर्षवर्धनच्या चांगुलपणाची साक्ष देत असल्याचे दिसले.
वाघवे येथील योगी प्रभुनाथ माध्यमिक विद्यालयात इयत्ता १० वी वर्गात हर्षवर्धन शिकत होता. लहानपणापासून तो हुशार, मनमिळावू स्वभावाचा हर्षवर्धन शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होता,. सर्वांशी आदराने वागणारा व खेळकर हर्षवर्धन चा मित्र परिवार मोठा होता.
एक महिन्यांपूर्वी हर्षवर्धन शाळेतून मित्रांसोबत घरी येत असताना तो रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.तब्बल २६ दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते.
अखेर त्याची मृत्यूशी झुंज व्यर्थ ठरली.त्याचा मृतदेह पाहून बोडके कुटुंबाने हंबरडा फोडला आणि मित्र परिवार ग्रामस्थांचा अश्रूचा बांध फुटला. हर्षवर्धनवर गेला महिनाभर कोल्हापूर येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत होता. बोडके कुटुंब जेमतेम शेतीवर उदरनिर्वाह करत असून आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्यामुळे ग्रामस्थांनी हर्षवर्धनच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली होती .मात्र ही मदत हर्षवर्धनचे प्राण वाचवू शकले नाहीत. त्याच्या मागे आईवडील , एक लहान बहीण, आजी-आजोबा, असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी ता.१२ रोजी आहे.


