टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा 15 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. हा सामना राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी इंग्लंडमधून जॅक लीच हा खेळाडू बाहेर पडला आहे.
तर तिसऱ्या सामन्यातून टीम इंडियाचा केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. केएलच्या जागी टीममध्ये युवा देवदत्त पडीक्कल याचा समावेश करण्यात आला आहे. या तिसऱ्या सामन्याला काही तास बाकी असताना टीम इंडियासाठी आणि क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे.
टीम इंडियाचे माजी दिग्गज कर्णधार दत्ता गायकवाड यांचं वृद्धपकाळाने निधन झालं आहे. दत्ता गायकवाड यांनी वयाच्या 95 व्या वर्षी बडोद्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. दत्ता गायकवाड हे टीम इंडियाचे सर्वात वयस्कर खेळाडू होते. तसेच टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे ते वडील होते. दत्ता गायकवाड यांच्या निधनाने कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक आजी माजी खेळाडूंना सोशल मीडियाद्वारे दत्ता गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
दत्ताजीराव गायकवाड यांची क्रिकेट कारकीर्द
दत्ताजीराव गायकवाड यांनी इंग्लंड विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. गायकवाड यांनी कसोटी कारकीर्दीत 1952 ते 1961 या दरम्यान 11 सामन्यांमध्ये 350 धावा केल्या होत्या. गायकवाड यांनी 1959 साली इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियांची कॅप्टन्सी केली होती. दत्ताजीराव यांनी क्रिकेटचा वारसा आपल्या मुलाला दिला. दत्ताजीराव यांचा मुलगा अंशुमन गायकवाड यांनीही 1975 ते 1987 दरम्यान 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं होतं.
बीसीसीआयकडून दत्तीजाराव गायकवाड यांना श्रद्धांजली
भारतीय क्रिकेटसाठी बहुमूल्य योगदान
दत्ताजीराव गायकवाड यांचं भारतीय क्रिकेटसाठी बहुमूल्य असं योगदान राहिलं आहे. दत्ताजीराव गायकवाड यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाका केला. दत्ताजीराव गायकवाड यांनी 1947 ते 1964 या 17 वर्षांदरम्यान बडोद्याचं प्रतिनिधित्व केलं. दत्ताजीराव गायकवाड यांनी 110 सामन्यांमध्ये 17 शतकं आणि 23 अर्धशतकांसह 5 हजार 788 धावा केल्या आहेत. तसेच दत्ता गायकवाड हे 2016 साली टीम इंडियाचे सर्वात वयस्कर खेळाडू होते.