जि. सातारा) : धोम-बलकवडी प्रकल्पाच्या कालव्याच्या प्रवाहात वाहून चाललेल्या मुलाला वाचविण्यासाठी प्रवाहात उडी मारलेल्या अजनुज येथील पित्याचा मृतदेह तब्बल २० तासांनंतर हाती लागला आहे.
या घटनेत पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याने तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. विक्रम पवार असे मृत पित्याचे नाव आहे.
अजनूज येथील विक्रम पवार हे गोधडी धुण्यासाठी रविवारी दुपारी धोम-बलकवडीच्या कालव्यावर गेले होते. सोबत वडील, पत्नी आणि त्यांचा मुलगा शंभूराज पवार हादेखील गेला होता. ते गोधडी धूत असताना छोटा शंभूराज पाण्यात उतरला. त्यामुळे प्रवाहात तो वाहत गेला. त्याला वाचविण्यासाठी विक्रम यांनीही पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याची गती अधिक असल्याने दोघेही पाण्यात वाहून गेले.
ग्रामस्थ व रेस्क्यू टीमने पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन तासांत कालव्याच्या प्रवाहात मुलगा शंभूराजचा मृतदेह आढळून आला. मात्र, पित्याचा शोध लागला नाही. कालव्याचे पाणी बंद करण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामस्थांनी रात्रभर शोधकार्य सुरूच ठेवले. सकाळी पाणी कमी झाल्यावर तब्बल २० तासांनंतर विक्रम पवार यांचा मृतदेह आढळला. शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.