प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
मलकापूर : देवदर्शनासाठी निघालेल्या महामार्गाच्या कडेला उभ्या कारवर उसाने भरलेला मालट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नवीन निर्माण झालेल्या नाल्याच्या कठड्यामुळे दोन सैनिक दांपत्याचे प्राण वाचले आहेत.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नांदलापूर हद्दीत अकॅडमिक हाइट पब्लिक स्कूल समोर झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दोन सैनिक दाम्पत्य आणि कार चालक असे पाच जण (एमएच १२ वायएफ ८७२०)मधून मिलिटरी अपसिंगे (ता. सातारा) येथून देवदर्शनासाठी कोल्हापूरला निघाले होते. पुणे-बंगळुरू महामार्गावर पहाटे चारच्या सुमारास नांदलापूर येथील अकॅडमिक हाइट पब्लिक स्कूल समोर आले असता चालकाने कार महामार्गाच्या कडेला थांबवली. काही वेळातच पाठीमागून ऊस भरलेला मालट्रक (एमएच ४५ ०८३३) हा भरधाव वेगात येऊन कारवर पलटी झाला.
या अपघातात सैनिक दाम्पत्यांसह चालक किरकोळ जखमी झाला आहे. मात्र, कारसह मालट्रक व उसाच्या मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उसाच्या मालासह मालट्रक कारवर पलटी झाला मात्र महामार्गालगत नवीन नाला बांधला आहे. यामुळे मालट्रक व ऊस नाल्यावर पडल्यामुळे व मालट्रकचा पुढील भाग कारच्या बॉनेटवर टेकला. यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघाताची माहिती मिळताच माहामार्ग देखभाल विभागातील क्रेनचे कर्मचारी सुनील कदम, राहुल कदम यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
नागरिकांसह वाहनधारकांच्या मदतीने व कदम क्रेनच्या साहाय्याने उसाचा माल बाजूला केला. उसाचा माल बाजूला करत कारमधील पाच जणांना सुखरूप बाहेर काढले. अपघाताची माहिती शहर व महामार्ग पोलिसांना दिली. माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह कऱ्हाड शहरचे पोलिस कर्मचारी अपघातस्थळी दाखल झाले. अपघातस्थळाचा पंचनामा करून व उसाचा माल दुसऱ्या वाहनात भरून सकाळी दहा वाजेच्या सुमारास अपघातग्रस्त वाहने बाजूला केली.
वेळ आली होती, पण काळ आला नव्हता
नांदलापूर हद्दीत पहाटे उसाचा ट्रक कारवर पलटी झाला. मात्र, मालट्रक कारच्या बॉनेटवर टेकला, तर नवीन बनवलेल्या नाल्यावर उसाचा माल टेकल्यामुळे कारमधील पाचही जणांना किरकोळ दुखापत झाली. हाच ट्रक व ऊस कारच्या मधोमध पडाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. या घटनेत काळ आला होता, पण सुदैवाने वेळच आली नव्हती म्हणून सर्व जण सुखरूप बाहेर आले.