Satara: बोरगावजवळ सहलीच्या ‘बर्निंग बस’चा थरार; चालक, शिक्षकांच्या प्रसंगावधानाने मुले सुखरूप

0
79

सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव (ता. सातारा) हद्दीत पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या शालेय सहलीच्या बसने रात्रीच्या एकच्या सुमारास अचानक पेट घेतला. ही घटना बुधवारी रात्री एकच्या दरम्यान घडली.

यावेळी बसचालक व शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यामुळे सुदैवाने पुढील अनर्थ टळला.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर आगाराची बस (क्रमांक एमएच- ११, टी- ९२८६) शालेय सहल घेऊन गेली होती. बसमध्ये विद्यामंदिर गोगवे, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर या प्राथमिक शाळेतील तिसरी ते सहावीमधील ५० विद्यार्थी होते.
शैक्षणिक सहल परतीच्या प्रवासाला असताना बोरगाव गावच्या हद्दीत रात्री एकच्या सुमारास बस आली असता तांत्रिक बिघाडाने बसने अचानक पेट घेतल्याचे चालकाच्या लक्षात आल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखून शिक्षकांच्या मदतीने मुलांना सुखरूप बाहेर काढले; मात्र मुलांचे साहित्य हे एसटीसहित जळून खाक झाले. सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या अपघाताची माहिती मिळताच तत्काळ बोरगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले.

पोलिसांनी लगेच सातारा नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबला पाचारण करून आग नियंत्रणात आणण्यात यश मिळविले; परंतु तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. यामध्ये विद्यार्थ्यांचे साहित्यही जळाले. काहीकाळ वाहतूक सेवारस्ता मार्गे पोलिसांनी वळविली होती. बसमधील सहलीच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या एसटी बसने पाठविण्यात आले. या घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here