इंडिया आघाडीत सतत फूट पडत असल्याचं दिसत आहे. एकामागून एक राजकीय पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडताना दिसत आहेत. आधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मग नितीश कुमार आणि आरएलडीनंतर आम आदमी पार्टीनेही मोठी घोषणा केली आहे.
आम आदमी पक्षानेही काँग्रेसला जागावाटपाची ऑफर दिली आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाने काँग्रेसला लोकसभेची फक्त एका जागा देत निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. तर आम आदमी पक्ष सहा जागांवर निवडणूक लढवणार आहे.
पंजाबमध्ये आप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. ‘आप’ने गोव्यातील एका आणि गुजरातमधील दोन लोकसभा जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
आपने दिली अशी ऑफर
आम आदमी पक्षाचे नेते संदीप पाठक यांनी म्हटले आहे की, आम्ही काँग्रेसला दिल्लीतील एका जागेवर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. तर आम आदमी पार्टी दिल्लीत सहा जागांवर निवडणूक लढवणार आहे. काँग्रेसने या प्रस्तावाला वेळेवर प्रतिसाद न दिल्यास आम आदमी पक्ष सहा जागांवर आपले उमेदवार जाहीर करेल, असेही संदीप म्हणाले.
आम आदमी पार्टीचे खासदार संदीप पाठक म्हणाले की,’ आमच्या काँग्रेस पक्षासोबत जागावाटपाबाबत दोन अधिकृत बैठका झाल्या पण या बैठकांचा काहीही परिणाम झाला नाही. या दोन अधिकृत बैठकांव्यतिरिक्त गेल्या महिनाभरात अन्य कोणत्याही बैठका झालेल्या नाहीत.’
‘आम्ही पुढच्या बैठकीची वाट पाहत आहोत, काँग्रेसच्या नेत्यांनाही पुढच्या बैठकीची माहिती नाही. आज मी जड मनाने इथे बसलो आहे. आम्ही आसाममधून तीन उमेदवार जाहीर केले आणि मला आशा आहे की भारत आघाडी त्यांना स्वीकारेल.’
बिहारमध्ये झटका
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबत पुन्हा राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा झटका लागला आहे. बिहारमध्ये आता भाजप आणि जेडीयूचे सरकार स्थापन झाले आहे. ज्यामुळे आरजेडी आणि काँग्रेस सत्तेबाहेर गेले आहेत.
पश्चिम बंगालमध्ये ही धक्का
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा आधीच केली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतून तृणमूल काँग्रेसही बाहेर पडला आहे.
भाजपकडून जुन्या मित्रपक्षांना साद
भाजपकडून मात्र जुन्या मित्रपक्षांना सोबत घेण्याची तयारी सुरु आहे. प्रादेशिक पक्षांना सोबत घेत देशात एनडीएला ४०० हून अधिक जागा जिंकण्याचा नारा पंतप्रधान मोदी यांनी दिला होता.