गोव्यामध्ये सूचना सेठने आपल्या 4 वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे. आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून सूचना सेठ हिला कोणताही मानसिक आजार नसून ती पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं समोर आलं आहे.
गोव्यातील न्यायालयात पोलिसांनी ही माहिती दिली आहे. पोलिसांनी 2 फेब्रुवारीला इन्स्टीट्यूट ऑफ सायकोलॉजी अँड ह्यूमन बिहेवियरने केलेल्या वैद्यकीय तपासणीचा रिपोर्ट गोव्यातील न्यायालयात सादर केला आहे.
बंगळुरूमध्ये AI-आधारित स्टार्टअप चालवणाऱ्या 39 वर्षीय सूचनाने 8 जानेवारीला तिच्या मुलाचा मृतदेह एका बॅगेत ठेवला होता. त्यानंतर तिला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने गोव्यातील एका हॉटेलमध्ये मुलाची हत्या केली असून ती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आपल्या लहान मुलाने त्याच्या वडिलांना भेटू नये म्हणून सूचनाने मुलाची हत्या केल्याचं सांगण्यात आलं.
आपल्या चार वर्षांच्या मुलाची हत्या करणाऱ्या सूचनाच्या वैद्यकीय अहवालात तिला कोणताही मानसिक आजार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी सांगितलं की, अहवालात सूचित निर्णय घेण्याची क्षमता अबाधित आहे आणि मनोवैज्ञानिक आजाराशी संबंधित कोणतीही लक्षणं समोर आलेली नाहीत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूचना सेठमध्ये सुसाइडल टेंडेंसी दिसून आली नाही. सूचनाने स्पष्ट शब्दांत उत्तरं दिली आहेत. तिला आठ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती, त्यानंतर ती न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयाने आता तिच्या न्यायालयीन कोठडीत 26 फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे. यासोबतच या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी न्यायालयाने 21 फेब्रुवारीची तारीख दिली आहे.