बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या चर्चेत आला आहे. रणवीरने पॉर्नस्टार जॉनी सिन्सबरोबर केलेल्या जाहिरातीमुळे त्याला ट्रोल केलं जात आहे. या जाहिरातीतून पुरुषांच्या लैंगिक समस्येवर भाष्य करण्यात आलं आहे.
अतिशय गंभीर अशा विषयावर या जाहिरातीतून विनोदी पद्धतीने भाष्य केलं गेलं आहे. पण, ज्या पद्धतीने या जाहिरातीत टीव्ही मालिकेचा सीन दाखविण्यात आला आहे. त्यावरुन टीव्ही अभिनेत्रींनी संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री रश्मी देसाईनंतर आता सयातनी घोषनेही या जाहिरातीबद्दल संतप्त पोस्ट शेअर करत रणवीर सिंगला सुनावलं आहे.
सयातनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये रणवीर आणि जॉनी सिन्सच्या जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला आहे. “‘सर्कस’मध्ये चांगला परफॉर्मन्स न देता आल्यामुळे ‘सिम्बा’ला पण प्रोडक्टची जाहिरात करण्यासाठी टीव्ही प्लॅटफॉर्मवर यावं लागलं. हेल्दी टीका करा पण टीव्ही इंडस्ट्रीला कमी लेखण्याचा प्रयत्न केला जात आहे. सगळ्या गोष्टी परफेक्ट असतात असं नाही. छोटा पडदा म्हटलं जात असलं तरी आमचा आवाका मोठा आहे. आम्ही घराघरात पोहोचलो आहोत. नोकरीच्या संधी आम्ही उपलब्ध करतो. मोठे स्टारही प्रमोशनसाठी टीव्ही शोमध्ये सहभागी होतात. त्यामुळे कृपया थोडा आदर दाखवा. स्वत: काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नये,” असं सयातनीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. सयातनीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
रणवीर सिंग आणि जॉनी सिन्सची ही जाहिरात TakeBoldCareOfHer या कॅम्पेनचा एक भाग आहे. बोल्ड केअरचा रणवीर ब्रँड अम्बेसिडर आहे. या जाहिरातीतून त्यांनी लैंगिक संबंधांवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.