Kolhapur: मुरलीधर जाधव यांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’; शिंदे गटात प्रवेश करणार?

0
71

उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी अखेर पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला. महिन्यापुर्वीच मुरलीधर जाधव यांना पदावरून हटवण्यात आले होते. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे, हातकणंगलेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी आपल्या विरोधात डावपेच रचल्याचा आरोप केला होता.

याघडामोडीनंतर अखेर त्यांनी ठाकरे गटाला रामराम केला. येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गेली 19 वर्ष शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहिलेले मुरलीधर जाधव यांची तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्हा उत्पादक संघ गोकुळच्या शासन नियुक्त संचालक पदी निवड केली होती. शिवसेना हुपरी शहर प्रमुख जिल्हाप्रमुख असा मुरलीधर जाधव यांचा प्रवास होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मुरलीधर जाधव यांनी शेट्टी यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला होता.

यानंतर शिवसेनेकडून मुरलीधर जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. या घडामोडीनंतर माध्यमांशी बोलताना जाधव यांना अश्रू अनावर झाले होते. मात्र, जाधव यांनी आतापर्यंत कोणतीही भूमिका स्पष्ट केली नव्हती. अखेर त्यांनी आज ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र केला.

शिवसेनेचे कोल्हापुरात तीन दिवशीय राष्ट्रीय अधिवेशन होत असून या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत त्यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसमवेत जाधव शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here