अर्धा किलो सोने घेऊन बंगाली कारागीर पळाला, सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ; कोल्हापुरातील घटना

0
47

कोल्हापूर : गुजरीतील कासार गल्ली येथील गरगटे कॉम्प्लेक्समध्ये तिस-या मजल्यावर राहणारा काशीनाथ बंगाली हा कारागीर ४० लाख रुपये किमतीचे सुमारे ५५० ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन गायब झाल्याचा प्रकार गुरुवारी (दि.

१५) सकाळी उघडकीस आला. कारागिरासह त्याच्याकडील कामगारांचेही मोबाइल बंद आहेत. या घटनेने गुजरीत खळबळ उडाली असून, जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू आहे.

गुजरीत दागिने घडविण्याचे काम बंगाली कारागिरांकडून केले जाते. विश्वासाने सराफ रोज त्यांच्याकडे लाखो रुपयांचे सोने सोपवतात. कासार गल्ली येथील गरगटे कॉम्प्लेक्समधील काशीनाथ बंगाली याच्याकडे काही सराफांनी दागिने घडविण्यासाठी सोने दिले होते. गुरुवारी सकाळी काही सराफ दागिने आणण्यासाठी गेले असता, बंगाली कारागिराचे घर बंद असल्याचे दिसले. त्याच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, फोन लागला नाही. कामगारांचेही मोबाइल बंद असल्याने सराफांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. दुपारपर्यंत तीन सराफांचे सुमारे ५५० ग्रॅम सोने बंगाली कारागिराकडे असल्याची माहिती समोर आली.

घटनेची माहिती मिळ‌ताच जुना राजवाडा पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गरगटे कॉम्प्लेक्समध्ये पोहचले. पोलिस निरीक्षक संजीव झाडे आणि रवींद्र कळमकर यांनी परिसराची पाहणी केली. कारागिराच्या घराला कुलूप असल्याने बाहेर सराफांनी गर्दी केली होती. दागिने घडविण्यासाठी सोने दिलेल्या कारागिरांनी तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here